Samrudhhi Accindent : समृद्धी महामार्गावर (samrudhhi Highway) अपघातांची मालिका (Accident) सुरुच असून सिन्नर शिवारात झालेल्या दोन अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. यातील एका अपघातात कार चक्क 35 फुटांवरुन खाली कोसळली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली आहे. मात्र समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 


समृद्धी महामार्गाच्या (Samrudhhi Mahamarg) शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन झाल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र खुला झाल्यापासून रोजच अपघाताच्या घटना समोर येत आहेत. काल समृद्धी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट 35 फूट उंच पुलावरुन खालून जाणाऱ्या अंडरपासच्या शिवार रस्त्यावर कोसळली. ही घटना सिन्नर (Sinnar Accident) तालुक्यातील आगासखिंड शिवारात दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. सुमारे 35 फुटांवरुन खाली कोसळलेल्या कारचा अपघातात चक्काचूर झाला. या अपघातात घनसोली नवी मुंबई येथील तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


घनसोली, नवी मुंबई येथील गोयल कुंटुबातील तिघे स्विफ्ट कारने घोटीकडून शिर्डीच्या दिशेने निघाले होते. भरवीर येथील समृद्धी महामार्गाच्या टोल प्लाझाने एन्ट्री करुन ते समृद्धी महामार्गाने शिर्डीच्या दिशेने निघाले होते. कार आगासखिंड शिवारात आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. आगासखिंड शिवारात असलेल्या अंडरपासच्या पुलाजवळ दोन्ही लेनच्या मधोमध असलेल्या ब्रीजच्या संरक्षक कठड्याला कारने धडक दिली. त्यानंतर कार खालून जाणाऱ्या शिवार रस्त्यावर कोसळली. सुमारे 35 फूट उंचावरुन कार आगासखिंडच्या शिवार रस्त्यावरील कूपनलिका रस्ता भागात कोसळल्यानंतर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.


महामार्गाच्या कामावर असलेल्या काहीजणांनी अपघात पाहिल्यानंतर तातडीने टोलनाक्यावर अपघाताची माहिती कळवण्यात आली. या अपघातात सनरीस गोयल, हेमीना गोयल व दिव्या गोयल सर्व रा. घनसोली, नवी मुंबई हे तिघे जखमी झाले. रुग्णवाहिकेतून त्यांना एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली.


फुलेनगर शिवारात अपघात


समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यात फुलेनगर माळवाडी शिवारात सकाळी दहा वाजेच्या सुमारास कारचे चाक निखळून गेल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर हद्दीतील समृद्धी महामार्ग माळवाडी-फुले नगर शिवारात सिन्नर बाजूकडून शिर्डी बाजूकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारच्या उजव्या बाजूकडील पुढील टायर निखळून पडल्याने संबंधित वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. संबंधित वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक प्लेटवर जाऊन आदळले. या अपघातात वाहन चालक रशिद खानसह इतर दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. मात्र अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त वाहन वावी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली.


हेही वाचा


Samriddhi Highway Accident : चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट दुसऱ्या लेनवर जाऊन आदळली, शिर्डी-भरवीर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात