Manmad Railway : मध्य रेल्वेच्या (Central Railway) भुसावळ विभागातील (Bhusawal Division) मूर्तिजापूर-माना खंड दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे रुळाखालील भराव वाहून गेल्याने त्याचा मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला. रात्रीपासून अनेक गाड्या 3 ते 13  तास विलंबाने धावत असल्याने अनेक प्रवाशी मनमाड स्थानकात अडकून पडले होते. अखेर आज सकाळपर्यंत दुरुस्तीचे काम झाल्याने वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र काल सायंकाळपासून सकाळपर्यंत गाड्यांची वाट पाहावी लागल्याचे प्रवाशांनी सांगितले. 


अकोला (Akola) जिल्ह्यातील मुर्तिजापूर परिसरात काल संध्याकाळी धुव्वाधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) माना कुरुम गावादरम्यान रेल्वे ट्रॅकखालील भराव वाहून गेल्याने मुंबई आणि नागपूरकडे जाणारी रेल्वे वाहतूक काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून पूर्णपणे थांबली होती. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्याबरोबर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. यामूळे नागपूर ते भूसावळदरम्यान अनेक स्थानकांवर गाड्या खोळंबल्या होत्या. दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास ही वाहतूक आता पूर्वपदावर होत आहे. मुंबई (Mumbai) आणि नागपूरकडे जाणारी अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक तासांपासून मनमाड रेल्वे स्थानकावर (Manmad Railway) अडकून पडलेल्या प्रवाशांसुटकेचा निश्वास सोडला आहे. 


अकोला जिल्ह्यातील माना रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाच्या खालचा मलमा वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक ठप्प होती. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अकोला जिल्ह्यातील माना रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाच्या खालील मलमा वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक गेल्या काही तासांपासून बंद होती, ज्याचा हजारो प्रवाशांना फटका बसला. अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. माना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे रूळाखालून वाहणाऱ्या नाल्याला देखील पूर आल्याने हा प्रकार घडला आहे. दरम्यान गस्तीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.


मनमाड रेल्वेस्थानकावर प्रवाशांचा खोळंबा 


दरम्यान या घटनेमुळे मनमाड रेल्वेस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यातच मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या बंद करण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे रात्रभर रेल्वे स्थानकावर गाड्यांची वाट पाहावी लागली. यात अनेक गाड्या विलंबाने धावत होत्या, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर काही रेल्वे स्थानकावरच थांबविण्यात आल्या आहेत. रात्रभर दुरुस्तीचे काम करण्यात येऊन आज सकाळी ही वाहतूक सुरळीत झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.