Nashik News : लग्न म्हणजे एक पवित्र सोहळा..दोन जीवांचे मिलन..सात फेऱ्यांसोबत आयुष्याच्या आणाभाका घेत सुखी संसार थाटायचा, असं सगळ्यांचंच स्वप्न असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा हा योग येतोच. मात्र, एका ठकबाज वधूने लग्न (Marriage) म्हणजे एकप्रकारे धंदा म्हणूनच निवडला आहे. हातावरील मेहंदीचा रंग उतरण्याआधीच पसार झालेल्या या वधूला (Bride) दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यापूर्वीच पकडल्याने एका तरुणाची फसवणूक टळली. नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या मालेगावातील (Malegaon) ही घटना आहे.
मेहंदीचा रंग उतरण्याआधीच दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याची ठकबाज वधूची तयारी
मालेगाव तालुक्यातील 'दाभाडी' गावच्या एका उपवराबरोबर अडीच लाख रुपये घेऊन लग्न केलेल्या वधूने काही दिवसांतच 85 हजारांचे सोन्याचे दागिने आणि 10 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा करत फसवणूक केल्याची घटना घडली होती. तिच वधू पुन्हा मालेगावातील 'दसाने' या गावात दुसऱ्या उपवरासोबत बोहल्यावर चढण्यासाठी दाखल झाल्याची माहिती पहिल्या उपवराला मिळाली. त्यानंतर त्याने थेट पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर लग्नाचा बाजार मांडणाऱ्या आणि लाखो रुपये उकळणाऱ्या वधूला पोलिसांनी ताब्यात घेतले.
असा झाला पर्दाफाश!
दसाने गावात लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या पाहुण्यांच्या सतर्कतेमुळे संबंधित ठकबाज वधूचाचा पर्दाफाश झाला. लग्नासाठी मंगल कार्यालयात पोहोचलेल्या पाहुण्यांना वधूला पाहताच धक्का बसला. बोहल्यावर चढणारी नववधूचं तीन महिन्यांपूर्वीच दाभाडीतील तरुणाशी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ताताडीने याबाबत तरुणाला माहिती दिली. आपल्या पत्नीने दागिने आणि रोकड घेऊन पोबारा केल्याची तक्रार या तरुणाने पोलीस ठाण्यात नोंदवली होती. परंतु पाहुण्यांनी दिलेल्या माहितीनंतर ती दुसऱ्या तरुणासोबत लग्न करत असल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पोलीस कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि संबंधित वधूला अटक केली. तिला 14 जुलैपर्यंत पोल कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोन महिला आणि दलालाचा शोध सुरु
दरम्यान वधूचे कथित लग्न जमवून देणाऱ्या नाशिक, कोपरगाव येथील दोन महिला आणि पुरुष नातेवाईकांचा (दलाल) पोलीस सध्या शोध घेत आहे. या तरुणीने आणखी तरुणांनाही गंडा घातल्याची शक्यता आहे. त्यामुळे पैसे घेऊन गरीब लोकांना गंडा घालणाऱ्या या टोळीकडून जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी मालेगाव तालुका पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा