Mumbai Megablock : रविवारच्या (9 जुलै) दिवसाचे नियोजन करणार असाल तर रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा आणि मगच घराबाहेर पडा. मध्य रेल्वेकडून मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे.  अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्या ठाणे ते विद्याविहार दरम्यान डाउन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच या गाड्या वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटं उशिरा पोहचणार आहेत. 


हार्बर मार्गावर मेगाब्लॉक


हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते  सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते  पनवेल मार्गावरील सेवा  सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच पनवेल ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सकाळी 10.16 ते 3.47 पर्यंत सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान ब्लॉक कालावधीमध्ये मुंबई  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला स्थानकादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. तर वाशी ते पनवेल दरम्यान देखील विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. 


ब्लॉक कालावधीमध्ये हार्बर मार्गावरुन  मुंबई  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रवास हा ट्रान्सहार्बर मार्गावरुन प्रवास करता येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे ते वाशी आणि नेरुळ मार्गावरुन सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.  तसेच देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.  तसेच यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वेकडून दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आली आहे. 


पण सध्या पावसामुळे मुंबईकरांची दुहेरी कोंडी झाल्याचं चित्र आहे. एकीकडे मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून मुंबईत मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईत जर असाच मुसळधार पाऊस कोसळत राहिला तर मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे रविवारच्या दिवशी जर तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर रेल्वेचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात येत आहे. 


हे ही वाचा :