Nashik Kalaram Mandir Satyagrah : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) दलितांसाठी अनेक आंदोलने केली, अनेक आंदोलनापैकी नाशिकच्या (Nashik) काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (Kalaram Mandir Satyagrah) हे महत्वाचे आंदोलन होते. फक्त हिंदूंनाच नव्हे तर त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा 2 मार्च 1930 रोजी सुरु झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. यानंतर दलितांना मंदिर प्रवेश मिळाला. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही काळाराम मंदिराची पायरी चढली नाही. 


आज 2 मार्च (2 March). दलित चळवळीच्या इतिहासात महत्वाचा दिवस. याच दिवशी नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह झाला. या सत्याग्रह आंदोलनात स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांनी सहभाग घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी या सत्याग्रहात सहभाग घेत काळाराम मंदिरात सत्याग्रह करण्याचे ठरवले. मात्र ज्यावेळी सर्वजण मंदिर प्रवेशासाठी काळाराम मंदिर (Kalaram Mandir) परिसरात गेले. त्यावेळी सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्वांनाच मंदिर प्रवेश करण्यासाठी मज्जाव करण्यात आला. आणि यानंतर काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा जवळपास पाच वर्षाहून अधिक काळ सुरु होता. 


नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशावेळी नाशिकच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना या आंदोलनाचं नेतृत्व करावे अशी गळ घातली. त्यानुसार 2 मार्च रोजी सत्याग्रह करण्याचे ठरले. मात्र हा सत्याग्रह शांततेच्या मार्गाने होईल, अशा सूचना बाबासाहेबांनी त्यावेळी दिल्या होत्या. त्या दिवशी मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. तसेच 3 मार्च 1930 रोजीही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरु ठेवावा असा उपदेश केला. पुढे महिनाभर हा लढा सुरुच होता. अखेर 9 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी नाशिकमधून भव्य मिरवणूक निघणार होती. या मिरवणुकीत सहभागी होण्याचे ठरले. त्यानुसार मिरवणूक सुरु झाल्यानंतर सत्याग्रहींनी रामरथ अडवला. यानंतर गदारोळ होऊन दगडफेक झाली, यात अनेक सत्याग्रही जखमी झाले. डॉ. बाबासाहेब आंबडेकर देखील जखमी झाले. यानंतर देखील मंदिर प्रवेशाचा हा लढा पाच वर्ष चालू होता. 


सत्याग्रहींना आंबेडकरांचे आवाहन 


"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे, म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का? हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही? याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."


स्वातंत्र्यानंतरच सर्व मंदिरे खुली 


शेवटी मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांच्याकडे पाठपुरावा केला, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आंबेडकरांनी 3 मार्च, 1934 रोजी भाऊराव गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरु ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा, ती शक्ती राजकीय हक्क आणि शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी, म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा, असं कळवलं. त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला आणि तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही. मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केलं. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.