Nashik Latest News Update : हाणामारी करणाऱ्या आरोपीला मालेगावच्या न्यायालयाने 21 दिवस नमाज अदा करणे आणि मशिदीच्या आवारात दोन झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे. मालेगावच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच अशी आगळीवेगळी शिक्षा सुनावण्यात आल्यानं निकालाची सर्वत्र चर्चा आहे..
मालेगाव सोनापुरा मशिदीत नमाज अदा करणारा आणि मशिदीच्या आवारात झाडांना पाणी घालणारा रउफ खान असे नाव आहे. रिक्षाचालक असणाऱ्या रुउफचे पाच वर्षांपूर्वी फिर्यादीशी भांडण झाले. त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. रुउफ ने फिर्यादीच्या गालात मारल्याने त्याच्या विरोधात मारहाण करणे, धमकवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मालेगावच्या न्यायालयात खटल्याचे काम जवळपास पाच वर्षे चालले. यातील कलम 325, 504, 506 या कलमातून आरोपी रुउफ ला दोष मुक्त करण्यात आले. मात्र भारतीय दंड विधान कलम 323 अंतर्गत मारल्याप्रकरणी आरोपीला दोषी ठरविण्यात आले. यावर 1 वर्ष कारवास आणि 50 हजार रुपयांचा दंड ही शिक्षा अपेक्षित होती. मात्र हलाखीची परिस्थिती घरातील कर्ता पुरूष असल्यानं तो शिक्षा भोगण्यासाठी गेल्यावर घरखर्च मुलांचे संगोपन कोण करणार असा प्रश्न उपस्थित करत बचाव पक्षाकडून सहानुभूती पूर्वक विचार करण्याची कोर्टाला विनंती करण्यात आली. त्यावर न्यायालयाने आरिपीस नमाज पडतो का? नमाजचे नाव सांग अशी विचारणा केली. त्यावर दोन वेळा नमाज अदा करत असल्याचे त्याने सांगितले त्यावर दिवसातून पूर्ण पाच वेळा नमाज अदा करत नसल्याने तिसरे अतिरिक्त मुख्यन्याय दंडाधिकऱ्यांनी 21 दिवस पाच वेळची नमाज फजर,जोहर, असर, मगरिब आणि इशा, अदा करण्याची आणि मशिदीच्या आवारात दोन झाडे लावण्याची शिक्षा सुनावली.
न्यायालय एवढयावरच थांबले नाहीत तर आरोपी वृक्षारोपण करतो की नाही याचा अहवाल देण्याचे कृषी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी करण्यात काही अडचण आली तर पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सोनापूरा मशिदीच्या इमाम यांना आरोपी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतो की नाही यावर लक्ष ठेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.
रुउफ कडून गुन्हा घडला त्याचा पश्चात्ताप त्याला झाला, त्याचे लहान मुले, घरची हलाखीची परिस्थिती आणि त्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप बघून न्यायालयाने सहानुभूती पूर्वक विचार करत त्याला सुधारण्याची संधी दिलीय. न्यायाच्या मंदिरात झालेल्या या आगळ्यावेगळ्या न्याय दानाची सर्वत्र प्रशंसा होत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून न्याय पालिकावर शंका उपस्थित करण्याचा प्रघात सुरू आहे, अशा सर्वाना हा निकाल आश्चर्यचा सुखद धक्का देणारा निकाल आहे.