Nashik Shivjayanti : नाशिकमध्ये (Nashik) शिवजयंतीचा मोठा उत्साह असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच सुरवातीला डीजेवर बंदी घालण्यात आली होती. मात्र पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी बंदी उठवत शिवजयंतीला डीजे वाजणारच, मात्र बारा वाजेपर्यंत आणि तोही जागेवरच वाजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


यंदाही शिवजयंती (Shivjayanti) उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करता यावे. यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत सार्वजनिक मित्रमंडळांना जागेवरच डी.जे. वाजविण्यास अनुमती देण्यात येईल, त्यासाठी मात्र आवाजाची मर्यादा पाळावी लागेल, असे सांगून पालकमंत्री दादा भुसे यांनी सार्वजनिक मित्रमंडळांनी केलेल्या सूचनांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी मंडळांच्या अडीअडचणी व शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी करावयाच्या उपायययोजनांवर चर्चा केली. 


यावेळी मंडळांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर व विशेष करून पोलिस खात्याकडून उत्सव साजरा करण्यासाठी परवानगीसाठी मंडळांची दमछाक केली जात असल्याची तक्रार केली. जुन्या नाशकात 150 मंडळांनी एकत्र येत शिवजन्मोत्सवाची पालखी काढण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक पद्धतीने डी. जे. विरहित निघणाऱ्या या पालखी मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासन परवानगी देत नसल्याचे सांगितले. मिरवणुकीसाठी मार्ग मंजूर नसल्याचे कारण पोलिसांकडून दिले जात असून, शिवजयंती उत्सवासाठी अशा प्रकारे परवानगी नाकारून 'अवमान केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. परवानगीसाठी दारोदारी भटकावे लागत असून मनपाकडून दहा ते बजार रुपये आकारले जात असल्याची तक्रार उपस्थित आयोजकांनी केली. 


नाशिक शहरातून मिरवणूक


पालकमंत्री भुसे यांनी रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुकीला परवानगी असून, जागेवर शिवजयंती साजरी करणाऱ्या मंडळांना आवाजाची मर्यादा राखून डी. जे. वाजविता येणार असल्याचे सांगितले. मिरवणूक पोलिसांकडून मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्यात दिले जात यावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिस व मनपा प्रशासनाने सुमारे साडेतीनशे मंडळांना शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी अनुमती दिल्याचे सांगितले. नाशिक शहरातून सहा, तर नाशिकरोड येथील सहा मंडळांनी मिरवणुकीसाठी अनुमती मागितली आहे. 350 मंडळांना ठिकठिकाणी जागेवर उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगितले.


तब्बल 61 फुटी मूर्तीची स्थापना


दरम्यान शिवजयंतीचा उत्सव शिगेला पोहचला असून यंदा शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीचे देखावे पाहायला मिळत आहेत. तर शहरातील अशोकस्तंभ मित्रमंडळाने तब्बल 61 फुटी मूर्तीची स्थापना केली असून जागतिक विश्वविक्रम होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.