Nashik Politics : नाशिक (Nashik) शहरात शिंदे गटाच्या बॅनर्सवर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांचा फोटो झळकला आहे. शिवजयंतीनिमित्त शिंदे गटाच्यावतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराचे बॅनरवर शिंदे गटातील काही प्रमुख नेत्यांसोबतच सत्यजित तांबे यांचा फोटो झळकला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
नाशिक शहरात शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti) शिंदे गटाकडून भव्य आरोग्य शिबिराचं (Health Camp) आयोजन करण्यात आलेला आहे. या आरोग्य शिबिराचे बॅनर नाशिक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहे. मुंबई नाका परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर शिंदे गटातील काही प्रमुख नेत्यांसह नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा देखील फोटो या बॅनरवर झळकला आहे. त्यामुळे हे बॅनर अधिकच चर्चेत आलेले आहे. या बॅनरवर श्रीकांत शिंदे, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, भाऊसाहेब चौधरी या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांसह सत्यजित तांबे यांचा फोटो झळकल्याने हे पोस्टर अधिकच चर्चेत आलेला आहे.
सत्यजित तांबे आता नेमके कोणाचे?
नाशिक पदवीधर निवडणुकीच्या (Nashik Graduate Constituency) वेळी नाशिकच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय घडामोडी सत्यजीत तांबे यांच्या भोवती घडल्या होत्या. त्यामुळे सत्यजित तांबे हे चर्चेत आले होते. अपक्ष लढून विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषद राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. आणि त्यानंतर आता त्यांचा फोटो शिंदे गटाच्या पोस्टरवर झळकला आहे. त्यामुळे हे पोस्टर अधिकच चर्चेत आलेला आहे. दरम्यान सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत अपक्ष आहे अपक्षच राहणार असल्याचे सांगितले होते, मात्र आता शिंदे गटाने आपल्या आरोग्य शिबिराच्या बॅनरवर फोटो आल्याने सत्यजित तांबे आता नेमके कोणाचे हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. त्यामुळे या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.
नाशिकमध्ये पुन्हा ठाकरे शिंदे गटाचा वाद
राज्यात शिंदे- ठाकरे गटाचा वाद विकोपाला गेलेला असतानाच नाशिकमध्येही त्याचे पडसाद उमटले. नवीन नाशिकमध्ये उत्तम नगर येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनरबाजीवरुन हाणामारी झाल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दोन्ही समर्थक असलेल्या दोन गटामध्ये बॅनर लावण्यावरुन बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले, मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांत केले. हाणामारीचे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते. शिवजयंती अवघी एका दिवसावर आलेली असताना घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे.