Shivaji Maharaj Jayanti 2023 : गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी आणि आता शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी शिंदे फडणवीसांनी घोषणा केलेली आहे. त्यानुसार विविध प्लॅन तयार केले आहेत. गल्ली ते दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळणार आहे.नेमकं शिंदे फडणवीस सरकार काय करणार ?
19 फेब्रुवारी हा शिवजयंतीचा दिवस! महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनाचा राज्यभर सोहळा साजरा केला जातो. यंदा हा सोहळा राज्यसह आग्राच्या किल्ल्यावरही पहिल्यांदा साजरा होणार आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिक आग्रा किल्ल्याच्या दीवाण ए आम मध्ये देखिल शिवजयंती साजरी होणार आहे. त्याचबरोबर राज्यात प्रत्येक शहरात आणि शहरातील प्रत्येक वॉर्डात शिवजयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला आहे आणि त्यानुसार तयारी करण्यात आलेली आहे. यावरून आता राजकारण सुरु झालंय….
दिल्ली ते गल्ली कशी असेल शिवजयंती
राज्य सरकारच्या वतीने शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जाणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच आग्र्यातही किल्ल्यावर शिवजयंती साजरी होणार आहे. राज्यात प्रत्येक शहरात शिवजयंतीच आयोजन करण्यात आला आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून मुंबईतील प्रत्येक वॉर्डात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. शिवजयंती साजरी करत असताना अनेक उपक्रम देखील राबवले जाणार आहेत.
यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर देखील मोठा उत्साहात शिवजयंती सरकारच्या वतीने साजरी केली जाणार आहे. सर्वत्र महाराज यांची 393 वी जयंती साजरी होणार आहे. त्यामुळे राज्यभर शिवजयंती साजरी होत असताना ऐतिहासिक अशा आग्र्यात ही शिवजयंती साजरी व्हावी यासाठी काही सामाजिक संस्थांकडून आणि राज्य सरकारकडून केंद्र सरकार कडे विनंती करण्यात आली होती. या विनंतीला मंजुरी देत सरकारने आग्रा किल्ल्याच्या दीवाण ए आम वर शिवजयंती सोहळ्याला परवानगी दिली आहे. दिल्लीतील आग्रा ते राज्यातील प्रत्येक गल्लीत उत्साहात शिवजयंती साजरी होणार आहे.
मुंबईत भाजपा आणि शिंदे गटाकडून तर्फे 227 वॉर्डमध्ये शिवजयंती कार्यक्रम होत असून आघाडी व मोर्चे मिळून 346 ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील आरतीचा महाजयघोष करण्यात येणार आहे. शिवजयंती निमित्ताने राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलघडून दाखवणारे देखावे, चित्रप्रदर्शन, शिवव्याख्याने, गरिबांना विविध स्वरुपात मदत, महाराष्ट्राच्या लोकधारेतील सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी कार्यक्रम, विविध स्पर्धा, मिरवणुका, भव्य देखावे, किल्ले दर्शन, शस्त्र प्रदर्शन, अशा विविध कार्यक्रमांनी गल्ली शिवजयंती निमित्ताने दुमदुमून जाणार आहे.