Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील होलाराम कॉलनी परिसरात पाच महिन्यापूर्वी घडलेल्या जबरी लुटीचा छडा शहर पोलिसांना लावण्यात यश आले आहे. यात दोघा सख्ख्या भावांना पोलिसांनी ताब्यात (Nashik Police) घेतले असून त्यांच्याकडून 53 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील मुख्य संशयित गायक असून स्वतःचा ऑर्केस्टा असताना गुन्हेगारीकडे वळल्याचे पोलिसांनी सांगितले. 


कोरोना काळात (Corona Lockdown) अनेकांचे व्यवसाय गेले, नोकऱ्या गेल्या, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. याच सुमारास नाशिकमधील सातपूर (Satpur) परिसरात राहणाऱ्या युवराज मोहन शिंदे (Yuvraj Shinde) आणि देविदास मोहन शिंदे यांनी सुरु केलेला ऑर्केस्टा बंद पडला. यांनतर त्यांनी एका व्यावसायिकाकडे चालकाची नोकरी केली. आणि यातूनच पैशांची चटक लागल्याने त्यांनी नाेकरी करताना मालकाला बनावट बंदुकीचा धाक दाखवून 66 लाखांची रक्कम चोरुन पसार झाले. त्यांनतर पोलिसांनी तपास सुरु करत गुन्हेशाखा युनिट एकने पाच महिन्यांच्या तपासानंतर दाेन सख्ख्या भावांना जेरबंद केले आहे. चाेरलेल्या या पैशांपैकी दहा लाख रुपये दाेघांनीही गाेवा, पुणे व मुंबईत माैजमजा करुन उडवले. त्यांच्याकडून 53 लाख रुपये आणि कार हस्तगत करण्यात यश आले, अशी माहिती गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली.


बंदुकीचा धाक दाखवून 66 लाख रुपये लुटले


नाशिक शहरातील होलाराम कॉलनी (Holaram Colony) येथील मनवानी बिल्डर्सचे संचालक कन्हैयालाल तेजसदास मनवाणी यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांचा कारचालक व एका संशयिताने 66 लाख 50  हजार रुपयांची रोकड आणि कार चोरुन नेली होती. 15 नाेव्हेंबर 2022 ला सायंकाळी मनवानी कार्यालयातून कारने घरी जात होते. होलाराम कॉलनीत आल्यानंतर कारचालक देविदास शिंदे याने कार थांबवली आणि कारमध्ये एक चोरटा आल्यानंतर त्याने बंदुकसदृश वस्तूचा धाक दाखवून मनवानी यांच्याकडील 66 लाख रुपये ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांनी मनवानी यांना पाथर्डी फाटा परिसरात एकटे साेडून कार चोरुन ती अंबड शिवारात सोडून पळ काढला हाेता.


दहा लाखांची रक्कम मौजमजेत उडवली... 


याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, दोघे फरारी असल्याने शहर पोलीस त्यांचा शोध घेत होते. गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या सूचनेनुसार अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, नाझीमखान पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, योगीराज गायकवाड, मुक्तार शेख यांचे पथक संशयितांच्या मागावर असताना सापळा तयार करून दोघे नाशिकला आल्यानंतर त्यांना सातपूर परिसरातून पकडण्यात आले. दोघांकडून लुटीतील रोकड आणि या पैशातून विकत घेतलेली चार लाखांची कार, 30 हजारांचा मोबाईल फोन, बॅग असा 57 लाख 31 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. दोघांना न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


मुख्य संशयित गायक आणि स्वतःचा ऑर्केस्टा 


चालक देविदास याचा भाऊ युवराज हा या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. त्याचा ऑर्केस्ट्रा असून गायक म्हणून तो प्रसिद्ध आहे. एका रियालिटी शोमध्ये देखील तो सहभागी झाला. होता. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबात आर्थिक चणचण भासत असल्याने त्यांनी मालकाला लुटल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.