Sonu Sood Revelaed: अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) कोरोना काळात अनेकांना सढळ हाताने मदत केली. कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांसाठी सोनू तर मसीहाच ठरला होता. त्यानं कामामुळे इतर शहरांत अडकलेल्या कामगारांना घरापर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्था करुन दिली. तसेच, अनेकांना आर्थिक मदतही केली. महामारीच्या कठीण काळात सोनूनं सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे त्याच्यावर एकिकडे कौतुकाचा वर्षाव होत होता. पण दुसरीकडे सोनूनं मदतसाठी करत असलेल्या खर्चावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसेच, त्याच्यावर काही गंभीर आरोपही झाले. यावर आता सोनूनं आपलं मौन सोडलं आहे. काही दिवसांपूर्वी आप की अदालत कार्यक्रमात बोलत असताना सोनूनं या मदतीसंदर्भात मोठा खुलासा केला आहे.
आप की अदालत या कार्यक्रमात सोनूला मदतीची प्रेरणा आणि त्यासाठी जमा केलेले पैसे कुठून आले? यासंदर्भात विचारणा केली. याबाबत बोलताना सोनूनं सांगितंल की, "जेव्हा मी मदत करायला सुरुवात केली, तेव्हा मला याची कल्पना होती की, मला गरजूंना मदत करायची आहे आणि पैसे हीच यातली महत्त्वाचा गोष्ट आहे. लोकांकडून अशा विनवण्या केल्या जात होत्या की, मला जाणवलं की, माझा दोन दिवसही निभाव लागणार नाही. माझ्याकडे जेवढे ब्रॅंड होते, त्या सगळ्यांना मी डोनेशन जमा करण्यास सांगितलं. या कामात मी डॉक्टर, विद्यार्थी, औषध बनवणाऱ्या कंपन्या, शिक्षक सगळ्यांना बरोबर घेतलं. असा जवळपास एकही ब्रॅंड नाहीये ज्यांना मी या कामात सोबत घेतलं नसेल. प्रत्येक ब्रॅंडला मी असं सांगितलं की, तुम्ही माझ्यासोबत या समाजकार्यात सहभागी व्हा, मी तुमच्या जाहीरातींमध्ये काम करण्यासाठी कोणतंही मानधन घेणार नाही."
सोनू सूदनं पुढे बोलताना सांगितलं की, "मला अनेक मोठ्या NGOs मधून फोन आले. ते म्हणाले की, देशाच्या 130 कोटींच्या लोकसंख्येसमोर माझा निभाव लागणार नाही. त्यावर मी त्यांना सांगितलं की, जे लोक मदतीच्या आशेनं माझ्या घराखाली येतात, त्यांना मी नाही म्हणू शकत नाही. आजची परिस्थिती अशी आहे की, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कोणत्याही शहरात, जिल्ह्यात, एखाद्या गावातसुद्धा तुम्ही सांगितलं तर मी कोणालाही शिक्षणासाठी मदत करू शकतो, शिकवू शकतो, एखाद्या गरजू व्यक्तीच्या उपचारासाठी मदत करू शकतो, एखाद्याला नोकरी देऊ शकतो. तुम्ही फोन केलात, तर मी नक्कीच मदत करू शकतो."
सोनूनं हेदेखील स्पष्ट केलं की, त्याचं सोशल मीडिया सांभाळायला कोणतीही टीम त्यानं ठेवली नव्हती. तो स्वतःहून प्रत्येक ट्वीटला उत्तर द्यायचा. सोनूनं कोविड काळात त्याच्या घरी आलेल्या प्रत्येकाला, तसेच सोशल मीडियावर मदत मागणाऱ्या प्रत्येकाला मदतीचा हात पुढे केला होता.
दरम्यान, सोनू सूदच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी तो पृथ्वीराज सिनेमात दिसून आला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. सध्या सोनू त्याच्या नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे. सोनू लवकरच आगामी चित्रपट फतेहमध्ये दिसून येणार आहे.