Nashik Police : नाशिक (Nashik) ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली असून जिल्हाभरात गावठी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. एकाचवेळी जिल्हाभरात पाचशे पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली असून जवळपास दहा लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सटाणा (satana) तालुक्यात सर्वाधिक गावठी दारू विक्री होत असल्याचे या कारवाईवरून पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
दरम्यान नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) विशेष पथक तयार करून कारवाई केली आहे. जिल्ह्यातील काही भागात गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यांनतर धडक कारवाईला सुरवात झाली. गावठी दारूचे (Liquor) रसायन बनवण्यासाठी लागणाऱ्या गुळ व नवसागर विक्रेत्यांवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Nashik Police) यांनी 500 अधिकारी अंमलदारांना सोबत घेऊन पहाटे चार वाजल्यापासून 46 ठिकाणी छापे टाकले आहेत. गावठी दारूचे अवैधपणे गायब करणाऱ्या अड्ड्यांवरून दहा लाख रुपयांची गावठी दारू रसायन व अन्य साधनसामुग्री देखील जप्त करण्यात आली आहे. या अड्ड्यांच्या चालकांवर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली तब्बल 34 गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वात ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभरात राबवलेल्या धाडसत्रात जिल्ह्यातील कळवण हद्दीतील अकरा, वाडीव येथील पाच मालेगाव तालुका येथील चार सुरगाणा घोटी, देवळा, सटाणा, जायखेडा आणि इगतपुरीमधील प्रत्येकी तीन, निफाड आणि पेठ मधील प्रत्येकी दोन सिन्नर, अभोना, वणी आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मधील प्रत्येकी एका ठिकाणी पोलिसांनी छापे मारून कारवाई केली आहे. दरम्यान अवैध दारूचे गाळप होणाऱ्या ठिकाणांसोबतच रसायन बनवण्यासाठी लागणाऱ्या गुळ विक्रेत्यांवर ही कारवाई केली आहे. यात प्रामुख्याने सटाणा तालुक्यातील ठेंगोडा व देवळा तालुक्यातील लोहणेर गावातून मोठ्या प्रमाणावर काळा गुळ व नवसागर जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान या कारवाईत पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक तेजबिरसिंग संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप जाधव, पुष्कराज सूर्यवंशी, कविता फडतरे, त्याचबरोबर जिल्ह्यातील 31 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह नऊ विशेष पथकांनी जिल्हाभरात तब्बल 46 ठिकाणी छापे टाकून अवैध चालकांचे धाबे दणाणले आहेत.
ग्रामीण पोलिसांचे आवाहन
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेले अवैध व्यवसाय रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस आणि बारा विशेष पतके तयार करण्यात आले आहेत या पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी चालणाऱ्या अवैध व्यवसायांवर धडक कारवाया करण्यात आल्या असून यापुढे जिल्हाभरात धडक मोहीम राबवली जाणार आहे त्यासाठी नागरिकांनी अवैध व्यवसाय संबंधी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हेल्पलाइनवर माहिती द्यावी, असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.