Diabetes and Heart : मधुमेह (Diabetes) एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. ही समस्या शरीरात निर्माण होणाऱ्या इन्सुलिनला अडथळा निर्माण होण्याने उद्भवते किंवा शरीरात पुरेसे इन्सुलिन (Insulin) तयार होत नसल्यानेही उद्भवते. इन्सुलिन हा घटक स्वादुपिंडामध्ये तयार होत असतो. हे इन्सुलिन आपल्या शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज किंवा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचं काम करत असतं.
मधुमेहाचे सर्वसामान्यपणे 3 प्रकार असतात
टाईप 1 मधुमेह : (लहानपणी किंवा तरुणपणात जडणारा मधुमेह) यावर उपाय नसतो, या प्रकारच्या रुग्णाला नियमितपणे इन्सुलिन घ्यावे लागते.
टाईप 2 मधुमेह : हा मधुमेह प्रौढांनाही होऊ शकतो आणि लहान मुलांना देखील. सर्वसाधारणपणे लठ्ठ व्यक्तींना या प्रकारच्या मधुमेहाची लागण होते. या प्रकारचा मधुमेह हा निव्वळ आहार नियंत्रण आणि औषधोपचांरानी किंवा दोन्ही मार्गांच्या एकत्रित अवलंबाने नियंत्रित करता येतो.
गर्भावस्थेत जडणारा मधुमेह : गर्भावस्थेतच हा मधुमेह जडतो, याचा परिणाम मातेवर आणि भ्रूणावर दोघांवरही होऊ शकतो. या प्रकारच्या मधुमेहामुळे भ्रूणामध्ये व्यंग निर्माण होणे, अवेळी प्रसुती, लठ्ठ बाळ होणे किंवा बाळाला जन्मापासूनच मधुमेहाची लागण होणे हे धोके संभवतात.
रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढतं, मात्र मधुमेह जडला आहे हे म्हणण्या इतकं ते वाढत नाही तेव्हा टाईप 2 मधुमेह आणि मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
मधुमेहामुळे हृदयविकार होण्याची शक्यता जास्त
मधुमेहामध्ये रक्तातील वाढलेले ग्लुकोज हे रक्तवाहिन्यांवर परिणाम करत असते. हळूहळू वाढलेले ग्लुकोज हे हृदय, डोळे आणि मूत्रपिंडावरही परिणाम करु लागते. मधुमेहामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची किंवा हृदयविकार (Heart Disease) होण्याची शक्यता दुप्पट किंवा तिप्पट होते.
मधुमेहामुळे मज्जातंतूंना हानी पोहोचते आणि वाहिन्यांमधील रक्ताचा प्रवाह मंदावतो, ज्याचा परिणाम हा डोळ्यांवर, मूत्रपिंडे निकामी होणे, अल्सर होणे किंवा संसर्ग होणे असा होऊ शकतो. अतिताण आणि कोलेस्ट्रॉलचे अतिप्रमाण हे धमन्यांसाठी अतिधोकादायक ठरते. हृदयातील धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होत जाते ज्यामुळे धमन्या जाम होतात आणि हृदयविकाराचा झटका येतो. हा संपूर्ण जगात आढळणारा हृदयविकार आहे.
हृदय बंद पडणे - यामध्ये हृदय पुरेशा प्रमाणात शरीराला रक्त पंप करु शकत नाही, म्हणजेच शरीराला पुरेसा रक्तपुरवठा करु शकत नाही.
कार्डिओमायोपथी- हृदयाचे स्नायू कमजोर होणे
जगभरातील असंख्य लोकांना मधुमेह झाला आहे आणि मधुमेहाची लागण होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. अनुवांशिक पद्धतीने काहींना मधुमेह होतो तर काहींना अरबट, चरबट खाणे, धुम्रपान किंवा दारु पिण्याने होतो. नुकतीच आम्ही एका तरुणावर शस्त्रक्रिया केली. या रुग्णाचं वय अवघं 32 वर्षे इतकं होतं. त्याचं काम हे बैठ्या स्वरुपाचं होतं आणि त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील वाईट होत्या. थोड्याशा चढणीवरही त्याच्या छातीत दुखायला लागायचं. त्याची टीएमटी (ट्रेड मिल टेस्ट) केली असता इंड्युसिबल इस्केमिया हा पॉझिटिव्ह आला होता (म्हणजेच त्याच्या हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नव्हता.) या रुग्णाची आणखी तपासणी केली असता त्याला टाईप-2 प्रकारचा मधुमेह झाल्याचे कळाले होते. अँजिओग्राम चाचणीमध्ये त्याच्या धमन्यांमधून रक्तप्रवाह नीट होत नसल्याचे दिसून आले होते. यामुळे त्याच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यानंतर हा रुग्ण बरा झाला, असं मुंबई सेंट्रल इथल्या वोक्हार्ट रुग्णालयातील हृदय शल्यविशारद सल्लागार डॉ. गुलशन रोहरा यांनी सांगितलं.
गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य वेळी निदान होणं गरजेचं
मधुमेहामुळे होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचे उचलायचे पाऊल म्हणजे योग्य वेळी निदान होणे आणि मधुमेहामुळे होणाऱ्या समस्यांविषयी पूर्ण माहिती मिळवणे. तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलून निदान कसे करावे याचे विविध मार्ग जाणून घेणे गरजेचे आहे. मधुमेहाचे अचूक निदान करण्यासाठी प्रभावी आणि परवडणाऱ्या चाचण्या उपलब्ध आहे. निरोगी जीवनशैली अवलंबणे गरजेचे आहे. सात्विक आणि वेळेवर जेवण, धुम्रपानाचा त्याग, नियमित व्यायाम, वजन कमी करणे यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतल्याने बराच फरक पडतो.
रग्णांनी रक्तातील साखरेचं प्रमाण नियमित तपासावं
गोळ्यांच्या माध्यमातून किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून, शरीरातील इन्सुलिनची मात्रा नियंत्रित राखणे गरजेचे असते. तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही ठरवू शकता. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे. रक्तातील साखर कमी झाली किंवा वाढली तर काय करावे, मधुमेहावरील औषधांचे दुष्परिणाम काय आहेत, मधुमेहाची औषधे आणि इतर औषधे एकत्र घेतल्यास त्याचा काय परिणाम होऊ शकतो याबाबत माहिती घेऊन त्यानुसार काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासले पाहिजे.
डॉ. गुलशन रोहरा, सल्लागार हृदय शल्यविशारद, वोक्हार्ट रुग्णालय, मुंबई सेंट्रल
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.