Nashik Igatpuri News : पुराच्या पाण्यातून पोहत केला वीज पुरवठा सुरळीत, इगतपुरीतील कर्मचाऱ्याचा थरारक व्हिडिओ
Nashik Igatpuri News : ईगतपुरीतील (Igatpuri) मुकणे धरणाच्या (Mukane Dam) परिसरात रायंबे येथील वीज पुरवठा खंडित झाल्याने कमर्चारी थेट पुराच्या पाण्यातून पाहून जात असल्याचा विडिओ समोर आला आहे.
Nashik Igatpuri News : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्याला जुलैच्या पहिल्या आठवड्यात झोडपून काढले. यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित (Power Outage) झाल्याने सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. अशातच इगतपुरी (Igatpuri) येथील महावितरणच्या कमर्चाऱ्याचा काळजाचा थरकाप उडविणारा विडिओ समोर आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. तो सुरळीत करण्याचे काम प्रगती पथावर आहे. अशातच पाऊस अधिक असल्याने धरणेही तुडुंब भरली आहेत. या पार्श्वभूमीवर मुकणे धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात पुराचे पाणी असल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान मुकणे धरणाच्या परिसरात रायंबे येथील वीज पुरवठा खंडित झाल्याने इगतपुरीचे कमर्चारी थेट पुराच्या पाण्यातून पाहून जात असल्याचा विडिओ समोर आला आहे. हा कर्मचारी पोहून जात विजेच्या खांबावर चढून जात विद्युत पुरवठा सुरळीत करीत असल्याचे व्हिडिओतुन दिसते आहे.
दरम्यान सदर व्हिडीओ महावितरणच्या (Mahavitran) अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे कि, ईगतपुरी तालुक्यातील मुसळधार पावसामुळे रायंबे येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमचा प्रकाशदूत मुकणे धरणातील पाण्याच्या प्रवाहात पोहत गेला. आणि वीज पुरवठा सुरळीत केला. अशा आशयाची फेसबुक आणि ट्विटर पोस्ट करण्यात आली आहे. अमोल जगले असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. यापूर्वी देखील प्रवीण शिंगवे यांनी दारणा नदीकाठी पाण्यात पडलेली विद्यूत तार पाण्यातून घेऊन जात विद्युत पुरवठा सुरळीत केला होता. दरम्यान या दोन्ही जनमित्रांच्या कार्याची महावितरणकडून दखल घेण्यात आली असून कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन गौरवही करण्यात आला आहे.
जीव धोक्यात घालून ड्युटी
एकीकडे महावितरणने कर्मचारी पुराच्या पाण्यात पोहून जात वीज पुरवठा सुरळीत करत असल्याचा विडिओ शेअर केला. मात्र दुसरीकडे एवढ्या पाण्यात कमर्चाऱ्यांला कोणत्याही सुविधा नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे महावितरण कर्मचाऱ्याचे कौतुक तर करत आहे, मात्र दुसरीकडे त्याचा जीविताच्या सुरक्षेसाठी उपाययोजना नसल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. ऐन पावसाळ्यात स्वतःचा जीव धोक्यात घालत महावितरणचे कंत्राटी कर्मचारी कशा पद्धतीने कामं करतात, याचे उदाहरण या व्हिडिओच्या माध्यमातून जनमानसात आले आहे.
महावितरणचा भोंगळ कारभार
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात विजेचे खांब कोसळले आहेत. येथील वीज पुरवठा खंडित झाल्याने तो सुरळीत करण्याचे काम सध्या सुरु आहे. अशातच इगतपुरी येथील हा व्हिडिओ प्रसारित झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे कर्मचाऱ्याने जीव धोक्यात घालून विद्युत पुरवठा सुरळीत केला, मात्र महावितरणकडून त्यास साधी सेफ्टी बॅग किंवा इतर सुरक्षेची साधने नाहीत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे.