Nashik News : एकीकडे शाळेत विद्यार्थी शिक्षकाचे (School) नाते गुरु शिष्याचे असते. मात्र अलीकडे कधी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना मारहाण होते तर कधी शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण होते. नाशिक शहरातील मनपा शाळेत ((Nashik NMC School) असाच प्रकार घडला आहे. येथील शिक्षकाने विद्यार्थ्यास मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.. 


काही दिवसांपूर्वी पेपर सुटल्यानंतर शिक्षकास मारहाण केल्याची घटना मनमाड (Manmad) शहरात उघडकीस आली होती. त्यानंतर नाशिक (Nashik) शहरात उलट प्रकार घडला आहे. शाळेतील मुलांचे भांडण सुरू असताना शिक्षकाने भांडण सोडविण्याऐवजी विद्यार्थ्यास मारहाण (Beaten) केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी असून मनपा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाल्याने त्यांनी संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकाला नोटीस बजावत खुलासा मागितला आहे. नाशिक शहरातील येथील मनपा शाळेत हा प्रकार घडला असून या निमित्ताने पालक, शाळा, शिक्षक, विद्यार्थी या चार घटकांना अशा घटना होऊच नये यासाठी मार्गदर्शनाची गरज असल्याचे दिसून येते. 


नाशिक शहरातील जेलरोड येथील मनपा शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण सुरु होते. यावेळी भांडणाची कुणकुण शिक्षकांना लागल्याने ते त्या ठिकाणी पोहचले. मात्र यावेळी शिक्षकाने भांडण सोडविण्याऐवजी विद्यार्थ्याला मारहाण केल्याचे समजते आहे. कर्ण चांदुडे व इतर मुलाचे शाळा आवारात भांडण सुरू होते. यावेळी शिक्षकांनी धाव घेत भांडण करणाऱ्या विद्यार्थ्यांवरच हात उगारत त्यांना मारहाण केली. कर्ण यास मारहाण केल्याचे त्याच्या गालावरील व्रणावरून दिसत आहे. विशेष म्हणजे, मुख्याध्यापिका यांच्या दालन आवारात हा प्रकार घडल्याची तक्रार विद्यार्थ्यांने केली आहे. दरम्यान, पालकांनी याबाबतची तक्रार शिक्षणाधिकारी धनगर यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडे याबाबत खुलासा मागितला आहे.


शिक्षणाधिकाऱ्यांनी मागविला खुलासा 


भांडणाच्या कारणावरून विद्यार्थी कर्ण चांदुडे या विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षकाने बेदम मारहाण केल्याने विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत आहे. या मारहाणीचे वळ विद्यार्थ्याच्या गालावर स्पष्टपणे दिसत असून गाल आणि कान लाल झाला आहे. घरी आल्यानंतर त्यास तापही भरल्याचे त्याच्या पालकांचे म्हणणे आहे. शाळेची मुख्यध्यापिका संबंधित शिक्षक यांना विद्यार्थी मारहाणप्रकरणी नोटीस बजावली असून त्याच्याकडे चोवीस तासात खुलासा मागविला आहे. याबाबत त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर नियमानुसार कारवाई केली जाईल. याप्रकरणी अधिक लक्ष घालून चौकशीही केली जाईल, अशी माहिती मनपाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली आहे.