Nashik News : नाशिकहून मराठवाड्यासाठी आतापर्यंत 70 टीमसी पाण्याचा विसर्ग, पाण्याची चिंता मिटली
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील धरणातुन (Water Discharged) आतापर्यंत गोदावरीच्या (Godawari) माध्यमातून जायकवाडी धरणाकडे (Jayakwadi Dam) जवळपास 70 टीमसी पाणी वाहून गेले आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनेक मध्यम धरणे शंभर टक्के भरले असून अनेक धरणातुन (Water Discharged) विसर्गही करण्यात येत आहे. तर आतापर्यंत गोदावरीच्या (Godawari) माध्यमातून जायकवाडी धरणाकडे (Jayakwadi Dam) जवळपास 70 टीमसी पाणी वाहून गेले आहे.
गेल्या आठवड्यात नाशिकसह (Nashik) शहर परिसरात पावसाची संततधार सुरूच होती. यामुळे अनेक धरणे ओव्हरफ्लो (Dam Overflow) झाली असून अद्यापही अनेक धरणांतून विसर्ग सुरू आहे. गंगापूर पाणलोट (Gangapur Dam) क्षेत्रात देखील पावसाचा जोर असल्याने गंगापूर धरण साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विसर्ग करण्यात येत आहे.
दरम्यान आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून गोदावरी मार्गे मराठवाड्यासाठी जायकवाडीत 70 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. शिवाय जायकवाडी धरणही जवळपास 100 टक्के भरले आहे. त्यामुळे मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली आहे. तसेच पुढील वर्षी मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास नाशिकमधून पाणी सोडण्याची आवश्यकता आता राहणार नाही. त्यामुळे नाशिककरांवरीलही पाणी सोडण्याचे आणि पाणी कपातीचे संकटही टळले आहे.
नाशिकमध्ये यंदा पुरेसा जलसाठा
मागील आठवड्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसाने नाशिकमधील सर्वच धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग करावा लागला होता. परंतु गेल्या 3 दिवसांपासून पावसाने दिलेल्या उघडीपमुळे शहरवासीयांचे लक्ष लागून असलेल्या गंगापूर धरणातील विसर्ग 3600 क्युसेकवरून कमी करत तो 1206 क्युसेक इतका करण्यात आला. तर नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून सोडण्यात येणारे पाणी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील धरणांमध्ये तब्बल 94 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी तो 67 टक्के म्हणजे जवळपास 27 टक्के कमी होता.
गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान दोन दिवसांपासुन नाशिक शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्येही उघडीप दिली असून धरणांत होणारी पाण्याची आवक कमी झाली. परिणामी धरणांतून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तर काही धरणातून पाणी सोडणे पूर्णपणे बंद केले आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे गंगापूर धरणात सध्यस्थितीत ९४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गोदाकाठी अजूनही नागरिकांनी तसेच स्थानिक रहिवाशांनी, तेथील व्यावसायिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन नाशिक महापालिकेने केले आहे.
जिल्ह्यातील धरणसाठा
गंगापूर धरण समूहातील धरणांचा जलसाठा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामध्ये कश्यपी 99, गौतमी गोदावरी 99, आळंदी 100, गंगापूर 96 वर पोहचले आहे. तर दारणा धरण समूहापैकी दारणा 97 टक्के भावली 100, मुकणे 98, वालदेवी 100, कडवा 89, भोजापूर 100 टक्के भरले असून गिरणा खोरे धरण समूहात चणकापूर 78 टक्के, हरणबारी 100 टक्के, केळझर 100 टक्के, गिरणा धरण ९३ टक्के भरले असून जिल्ह्यातील धरणांतील एकूण जलसाठा ९३ टक्क्यांवर पोहचला आहे.