Nashik Ganeshotsav : नाशिकच्या गणेशोत्सवात यंदा ढोल पथकांचा 'नादब्रम्ह', दोन वर्षांनंतर पुन्हा 'धीना धीं धा'....
Nashik Ganeshotsav : गणेशोत्सव (Ganeshotsav) म्हटला की नाशिक (Nashik) ढोलचा निनाद आपसूक कानावर पडतो. कोरोनाच्या दोन वर्षांच्या अडथळ्यांनंतर यंदा जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे.
Nashik Ganeshotsav : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे (Ganeshotsav) सर्वानाच वेध लागले आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सव म्हटला की नाशिक (Nashik) ढोलचा निनाद आपसूक कानावर पडतो. कोरोनाच्या दोन वर्षांच्या अडथळ्यांनंतर यंदा जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. तर दुसरीकडे नाशिकचे ढोल (Nashik Dhol) पथकांची जय्यत तयारी सुरू आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. मात्र आता शिंदे सरकारने सर्व निर्बंध हटवल्याने यंदाचा गणेशोत्सव राज्यात धुमधडाक्यात पार पडणार असून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नाशिक ढोलचा आवाजही पुन्हा घुमणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाबरोबर नाशिककरांना नाशिक ढोलचे वेध लागले आहेत.
नाशिक ढोल म्हटलं की पन्नास ते साठ जणांचा ऊर्जेने भरलेलं पथक पहायला मिळते. नाशिक शहर व परिसरात शंभरहून अधिक ढोल पथके असून, या ढोल पथकांचा सध्या जोरदार सराव सुरू असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला. मात्र यंदा ढोल पथकांच्या निनादात गणेशोत्सव पार पडणार आहे.
सलग दोन वर्षे निर्बंध आल्याने या वादकांचाही हिरमोड झाला होता. मात्र या वर्षी ते जोरदार तयारीला लागले आहेत. अगदी डॉक्टर, उद्योजक, शिक्षक, विद्यार्थ्यांपासून ते लहान मुलांचा पथकात सहभाग बघायला मिळतो. दिवसभराची सगळी कामे आवरून संध्याकाळी ते सरावासाठी एखाद्या मोकळ्या मैदानात किंवा लॉन्सवर एकत्र येतात आणि कमरेला ढोल बांधत तर कोणी ताशा, झांज वाजवत दिवसभराचा कामाचा तणाव हलका करतात.
अनेक वर्षांची परंपरा
नाशिक शहरात गणेशोत्सव म्हटलं की ढोल पथक असे समीकरण फार पूर्वीपासून पाहायला मिळते. गणेशोत्सव स्थापना व विर्सजनाच्या मिरवणुकीत ढोल पथकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर दिसून येत असतो. शहरातील काही पारंपरिक गणेश मंडळेच या ढोल, लेझीम पथकांचा वापर करीत होती. मात्र, हळूहळू नाशिक ढोल या नावाने या ढोल पथकांची संख्या वाढू लागली.
नाशिकची ढोलपथके
सध्या शहरातील शिवनाद वाद्य पथक व विघ्नहरण ढोल पथक, शिवनाद वाद्यपथक, विघ्नहरण ढोल पथक, सिंहगर्जना, रामराज्य, विघ्नहरण, तालरुद्र, शिवराय, शिवतांडव, मनकामेश्वर, ग्रहराज, श्री त्र्यंबकराज, शिवगर्जना, शिवसंस्कृती, माऊली, नटनाद, सहस्त्रनाद, शंभुनाद आदी ढोल पथके गणेशोत्सवात रंगत आणतात. सध्या या ढोल पथकांचा कसून सराव सुरु असून यंदाच्या गणेशोत्सवात पुन्हा एकदा नादब्रह्म ऐकायला मिळणार आहे.