(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Ganeshotsav : गणेश विसर्जन नदी पात्रात करण्यास मज्जाव, नाशिकमध्ये गणेश विसर्जनासाठी 71 ठिकाणे निश्चित
Nashik Ganehotsav : यंदा नाशिक (Nashik) मनपाकडून गणेश विसर्जनाकरिता (Ganesh Immersion) शहरात 71 ठिकाणे निश्चित झाली आहेत.
Nashik Ganehotsav : गणेशोत्सव (Ganehotsav) सुरु झाल्यानंतर नाशिक मनपा प्रशासन गणेश विसर्जनाच्या (Ganesh Immersion) जोरदार तयारीला लागले असून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (NMC commissioner) यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सहा विभागात गणेश विसर्जन ठिकाणी विविध कामे पूर्ण केली जात आहेत. देवळाली गावात (Deolali Camp) गणेश विसर्जन ठिकाणी जलपर्णी आणि गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. दरम्यान यंदा मनपाकडून गणेश विसर्जनाकरिता शहरात 71 ठिकाणे निश्चित झाली आहेत.
तब्बल दोन वर्षानंतर शहरात गणेशाचे (Ganesh) आगमन मोठ्या थाटामाटात झाले. तसेच दीड दिवसांचे गणेशाचे विसर्जनही करण्यात आले. यानंतर दहा दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी नाशिक मनपाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिवाय रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. तसेच मिरवणुकीच्या मार्गांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. तसेच बांधकाम विभागाकडून डांबर आणि खडीच्या सहाय्याने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्णत्वास गेल्यावर आता गणेश विसर्जन ठिकाणी कामे केली जात असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली आहे.
नाशिक मनपाच्या (Nashik NMC) सहा विभागात रस्ते दुरुस्तीच्या कामांकडे अभियंत्याचे लक्ष आहे. नाशिक पश्चिम विभागात पारीजात नगर, महात्मानगर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. भोसला मिलिटरी स्कूल प्रवेशद्वारासमोरील रस्ते बुजवण्यात आले आहेत. सातपूर प्रभाग क्रमांक 10 मध्ये सुला चौक ते त्र्यंबक रोड दरम्यान खड्डे बुजवण्यात आले आहेत. नाशिक रोड विभागात एमएनजीएल कंपनीने केलेली खोदाई बीएम मटेरीअलने बुजवण्यात आली आहे. याच विभागात राणी लक्ष्मीबाई रोड, देवळाली गावातील रस्ते बुजवण्यात आले आहेत.
अधिकाधिक मूर्ती दान कराव्यात
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांचे घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन नदीपात्रात करू नये. मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रांवर त्यांच्या मूर्ती दान द्याव्यात तसेच निर्माल्यदेखील संकलन केंद्रांवर जमा करण्यात यावे. नागरिकांना दीड, तीन, पाच, सात दिवसाच्या मुर्तींचे विसर्जनाकरिता नैसर्गिक विसर्जन स्थळे उपलब्ध असतील. कृत्रीम विसर्जन स्थळे हे फक्त दहाव्या दिवसाच्या विसर्जना करीताच उपलब्ध असतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
विसर्जनाकरीता 71 ठिकाणांची निश्चिती
नाशिक शहरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. गणेश मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या गणेश विसर्जन स्थळांवर गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलित करण्यात येणार आहे. याकरिता मनपाने शहरातील सर्व सहा विभागात एकूण 71 नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांची निश्चिती केली आहे. सातपूर प्रभाग क्रमांक 26 गणेश घाट आयटीआय पुलाजवळ कृत्रिम तलाव मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच श्रीराम कॉलनी गणेश चौक येथे स्वच्छता करण्यात आली आहे.