![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nashik Rain : गंगापूर धरणांतून विसर्ग घटवला, गोदेचा पूर ओसरायला सुरवात!
Nashik Rain : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील गंगापूर धरणातून (Gangapur Dam) देखील विसर्ग घटवण्यात आल्याने गोदावरीचा पूर (Godavari flood) काही अंशी ओसरला आहे.
![Nashik Rain : गंगापूर धरणांतून विसर्ग घटवला, गोदेचा पूर ओसरायला सुरवात! Maharashtra News discharge from Gangapur Dam has been reduced, Godavari flood receding Nashik Rain : गंगापूर धरणांतून विसर्ग घटवला, गोदेचा पूर ओसरायला सुरवात!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/5068c6937d494ccb35429277227613951657873212_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Rain : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) वगळता इतर भागात पावसाचा जोर कमी झाला असून बहुतांश धरणांमधून विसर्गाचे प्रमाण कमी करण्यात आले. त्यामुळे गोदावरी, (Godavari) दारणा व कादवासह अन्य नद्यांची पूरस्थिती काहीशी कमी होण्यास हातभार लागला आहे. गंगापूर धरणातून (Gangapur Dam) देखील विसर्ग घटवण्यात आल्याने गोदावरीचा पूर काही अंशी ओसरला आहे.
नाशिकसह जिल्ह्यात सलग सहा ते सात दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण असले तरी पावसाच्या सारी अधून मधून येत आहेत. त्यामुळे नागरिक देखील घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार सुरगाणा तालुक्यात 71, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर प्रत्येकी 54 आणि पेठ तालुक्यात 38 मिलीमीटरची नोंद झाली. याच भागात सातत्याने मुसळधार पाऊस सुरू होता. तिथे जोर बराचसा कमी झाला असून मालेगाव, बागलाण, नांदगाव, सिन्नर, येवला, चांदवड व निफाडमध्ये तुरळक पाऊस आहे.
दरम्यान जिल्ह्यातील पूर परिस्थिती पाऊस कमी झाल्यानंतर ओसरली आहे. मात्र काही भागात दरडी कोसळल्याने वाहतूक बंद आहे. यामध्ये सुरगाणा तालुक्यात भवाडा ते गहाले रस्त्यावरील पुलालगतचा भराव वाहून गेल्यामुळे वाहतूक बंद ठेवली गेली. देवळा तालुक्यातील भाबडबारी घाटात दरड कोसळल्याने एकेरी पध्दतीने वाहतूक सुरू ठेवण्यात आली. तर दरवर्षीं गोदावरीचा पुराचा फटका ज्या दोन गावांना बसतो. सायखेडा आणि चांदोरी येथील अनेक कुटुंबाना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले.
धरणातील आजचा विसर्ग
दरम्यान जिल्ह्यात पाऊस ओसरला असला तरीही बहुतांश धरणांतुन अद्यापही विसर्ग सुरु आहे. मात्र विसर्ग घटविण्यात आल्याने पूरस्थिती निवळण्यास मदत झाली. आज दुपारी बारा वाजेनंतर गंगापूरमधून 7128, दारणातून 10670, कडवा 3233, आळंदी 961, पालखेड ७९५०, करंजवण 1352, वाघाड 2745, पुणेगाव 653, नांदूरमध्यमेश्वर 32822 तर होळकर पुलाखालून 10502 क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पावसाने विश्रांती घेतल्याने शहरातून वाहणाऱ्या गोदावरीची पातळी काही अंशी कमी झाली आहे.
पुरात वाहून गेलेल्यांची संख्या सातवर
सलग पाच ते सहा दिवसात जिल्ह्यात ठिकठिकाणी पुरात वाहून गेलेल्यांची संख्या सातवर गेली आहे. शुक्रवारी अंजनेरी येथील एक जण तलावात बुडाला. त्यांचा शोध सुरू असल्याचे त्र्यंबकचे तहसीलदार दीपक गिरासे यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वरमध्ये दोन, पेठमध्ये एक, सुरगाणा तालुक्यात दोन आणि दिंडोरी, नाशिक तालुक्यात प्रत्येकी एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. पावसात दिंडोरी, चांदवड व सुरगाणा तालुक्यात नऊ घरांची पडझड झाली. तर काल सुरगाणा तालुक्यात तीन बैलांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)