Nashik Women Farmer : आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपले अस्तित्व यशस्वीपणे सिद्ध करीत आहेत. त्यात शेती क्षेत्र देखील मागे नाही. शेतीमध्ये (Farming) तर महिला सुरवातीपासूनच पुरुषांच्या बरोबरीने राबताना आपण पाहत आहोत. एवढेच नाहीतर काही महिलांनी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीचे उत्पादन वाढवून यशस्वीपणे शेती करीत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) तालुक्यातील दाभाडी (Dabhadi) येथील भावना निळकंठ निकम या प्रयोगशील शेतकरी महिलेने कुटुंबाची जबाबदारी सांभाळून यशस्वी महिला शेतकरी म्हणून आत्मविश्वासाने शेती क्षेत्रात गगनभरारी घेत आहे.
मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील भावना निळकंठ निकम (Bhavna Nikam) या एक प्रयोगशील महिला शेतकरी (Women farmer) आहेत. या साधारणपणे 12 वर्षापासून शेती व्यवसायात असून त्यांचे शिक्षण एफवायबीएपर्यंत झाले आहे. भावना निकम यांच्याकडे सहा हेक्टर असून वहितीखालील असून त्यात प्रामुख्याने द्राक्ष, डाळींब, टोमॅटो, पॉली हाऊस व शेडनेटमध्ये शिमला मिरची व इतर भाजीपाला पिके घेतली जातात. त्या अभिमानाने सांगतात की, नुसती बांधावरची नव्हे तर ढेकळातील अस्सल शेतकरी आहे. शेतीतील जवळपास सर्वच कामे जसे निंदणी, फवारणी, ट्रॅक्टरचलीत साधनांचा वापर करणे एवढेच नव्हे तर ट्रॅक्टर चालविणे, बाहेर गावावरुन शेतमजुरांना कामासाठी शेतात आणने, यासारखे कामेही त्या वेळप्रसंगी करीत असतात.
दरम्यान महिला शेतकरी निकम यांनी पाण्याच्या उपलब्धतेसाठी 1.25 कोटी लिटर पाण्याची क्षमता असणारे शेततळे (Water Storage) उभारले आहे. त्याचबरोबर कृषि विभागाच्या मदतीने ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे जसे ब्लोअर, रोटाव्हेटर, पल्टी नांगर, कल्टीवेटर इत्यादी कृषि यांत्रिकीकरणाची शेतीला जोड दिली आहे. दुसरीकडे रासायनिक खतांच्या अति वापराने शेतजमीन व पर्यावरण यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पीक उत्पादन गुणवत्ता वाढावी, यासाठी सेंद्रीय खतांचा जसे कंपोस्ट खत, गांडुळखत, हिरवळीचे खत, बायोगॅस स्लरीचा वापर करुन जमीनीची सुपीकता वाढवीत व टिकवित आहे. बाजाराभावाचा कल, जमिनीचा स्तर व पीक फेरपालट यांचा विचार करुन पिक घेतली जात आहेत.
12 हजार पक्षांचा कुक्कुट पालन शेडही उभारला
शेतीला जोडधंदा म्हणून 12 हजार पक्षांचे कुक्कुट पालन शेड उभारुन व्यवसाय सुरु केला आहे. पॉली हॉऊसची उभारणी 0.20 हेक्टर क्षेत्रात करुन त्यात ढोबळी मिरचीची लागवड केली असून त्याची विक्री वाशी, नवी मुंबई येथील मार्केटमध्ये होते. शेतातील राहत्या घरापासुन 10 कि. मी. अंतरावरील जिरायत क्षेत्राची सपाटीकरण करुन त्यात 1.00 हेक्टर क्षेत्रावर भव्य शेडनेटची उभारणी केली असून त्यात फॉगर्स व ठिंबक सिंचनाद्वारे पाणी देण्याची व्यवस्था व पिकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करुन दर्जेदार व चांगल्या गुणवत्तेचा भाजीपाला पिकांचे उत्कृष्ट उत्पन्न घेत आहेत.
महिलांच्या नावे सातबारा
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विधवा व निराधार आदिवासी महिलांसाठी संजय गांधी निराधार योजनेतून मानधन मिळून देण्यासाठी त्यानी विशेष प्रयत्न केले. लक्ष्मीमुक्ती योजनेंतर्गत मालेगाव तालुक्यातील साकुरी या गावातील महिलांची नावे पुरुषांबरोबर सातबाऱ्यावर लावण्यासाठी गावातील कुटूंब प्रमुखांचे प्रबोधन व मतपरिवर्तन करुन या गावातील काही महिलांची नावे सातबाऱ्यावर लावण्यात आली. कृषी अधिकारी आणि इतर सहकाऱ्यांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे आणि त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच जीवनात अमुलाग्र बदल झालेला आहे. पती व सासुबाई यांच्या सहकार्यामुळेच शेतीची धुरा आत्मविश्वासाने सांभाळत असल्याने सर्वांची ऋणी व आभारी असल्याचे भावना निकम यांनी सांगितले.