Nashik Corona Mockdrill :  देशभरासह राज्यात कोरोनाने (Corona) पुन्हा डोकंवर काढलं आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Patients) झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आजपासून नाशिक (Nashik) जिल्हा रुग्णालयात मॉक ड्रिल करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. 


कोरोनाच्या (Coronavirus Updates) तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभर कोरोना मॉकड्रील (Mock Drill) केले जात आहे. ज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे. रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध सामाग्री रुग्णालयात आहे की नाही? याची खात्री केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण देशभरात मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत मॉकड्रिल घेण्यात आले. 


देशात कोरोना (Coronavirus) पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्यानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयही खडबडून जागं झालं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण देशभरात 10 आणि 11 एप्रिलला मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज आणि उद्या अशा दोन दिवसांत देशभरात मॉकड्रील पार पडणार आहे.


नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलला मॉकड्रील.... 


नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलला मॉकड्रील घेण्यात आली. यात पेशंट आल्यानंतर टेस्टिंग टेस्ट होते का? त्या सुविधा आहेत का? कोरोना टेस्ट किट्स आहेत का? त्यानंतर रुग्णाला रिपोर्ट मिळतो का? किती दिवसांनी रिपोर्ट मिळतो? पेशंटला जर गरज असेल तर ऍडमिट करायची व्यवस्था आहे का? आयसोलेशन वॉर्ड आहे का? त्या वॉर्डमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था आहे का? व्हेंटिलेटरची गरज असल्यास ती आहे का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे या मॉकड्रील मधून घेण्यात आली आहे. त्यांच्यासार नाशिक जिल्हा रुग्णालयात 80 आयसीयू बेड्स असून 58 व्हेंटीलेटर्स आहेत. याचबरोबर टेस्टिंगची व्यवस्था असून यानुसार नाशिक आरोग्य प्रशासनाची तयारी पूर्ण असल्याचे भारती पवार यांनी सांगितले. 


गरज असेल तिथे मास्क वापरा... 


जगभरात जवळपास 80 ते 88 हजार कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे अजूनही करोना संपलेला नाही, याचे वेगवेगळे व्हेरिएंट्स येत आहेत. काही महिन्यापूर्वी जसा ओमीक्रोनचा उद्रेक झाला होता, त्याबरोबर ओमिक्रोनचे इतर व्हेरिएंट्स आढळून येत होते. मात्र सद्यस्थितीत आढळून येत असलेला व्हेरिएंट्स फारसा घातक नसून यात रुग्ण घरी उपचार घेऊन देखील बरा होत आहे. पेशंटला व्हेंटिलेटर किंवा आयसीयू बेडची गरज पडत नाही. परंतु पेशंटला मात्र काही प्रमाणात त्रास होतो आणि म्हणून पेशंट असेल किंवा सीनियर सिटीजन असतील, यांना देखील विशेष काळजी घेण्याचा आवाहन सरकारने केलेले आहे. गरज असेल तिथे मास्कचा वापर करा, विशेष करून गर्दीच्या ठिकाणी, हॉस्पिटलमध्ये, जिथे इन्फेक्शनचा धोका असतो, तिथे मास्क जर लावला पाहिजे असे देखील सूचना भारती पवार यांनी दिल्या.