बीड : येथील पालीमध्ये एका महिला शेतकऱ्याने प्रजासत्ताक दिनापासून चक्क स्मशानभूमीतच आमरण उपोषण सुरु केलं आहे. पाटबंधारे विभागाने चुकीच्या पद्धतीने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, यासाठी तारामती सोळंके यांनी हे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज (शुक्रवार) तिसरा दिवस आहे.


पाली येथील शेतकरी अर्जुन कुंडलीक सोळंके यांनी भूमीअभिलेख कार्यालयाकडून एकत्रिकरणात झालेल्या अनियमिततेमुळे 24 नोव्हेंबर, 2020 रोजी बीडच्या पाटबंधारे कार्यालयासमोरच अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहन केले होतं. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात बीडच्या पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता, भूमी अभिलेख उपअधीक्षक आणि बीडचे उपजिल्हाधिकारी या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता. पण गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट हे तीन अधिकारी मृत अर्जुन यांच्या पत्नी तारामती यांच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप तारामती यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून तारामती यांनी थेट स्मशानभूमीतच आंदोलन सुरू केलं आहे


भूमीअभिलेख कार्यालयाकडून एकत्रिकरणात झालेल्या अनियमिततेमुळे अर्जुन सोळंके यांचे संपादित क्षेत्र आणि उर्वरित क्षेत्र यांच्यात गुंतागुंत झाल्याने ते जिल्हा प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होते. मात्र या प्रकरणी संबंधित अधिकारी काहीच कारवाई करत नसल्याने दप्तर दिरंगाईला कंटाळून हताश झालेल्या अर्जुन यांनी आत्मदहन केलं होतं. त्यानंतर देखील प्रशासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांची दखल न घेतल्यामुळे त्यांच्या पत्नीला असं स्मशानात बसून आंदोलन करावं लागत आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करून त्यांचा मोबदला त्यांना न दिल्यास शेतकरी संघटनेच्यावतीने देखील तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


हे ही वाचा-



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा