Nashik Success Story : हल्ली उच्च शिक्षण घेऊनही नोकरी (Job) मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. त्यामुळेअनेकजण जे येईल ते काम हाताशी धरून रोजगार करत असतात. तर काहीजण शिक्षण सोडून व्यवसाय करण्याला प्राधान्य देतात. असाच एक अवलियाने शिक्षक (Teacher) होण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीएड केले. मात्र दहा वर्ष शक्षक भरती न झाल्याने निराश न होता वेगळी वाट धरली. पट्ठ्याने कुक्कुटपालनाचा (Poultry Farm) व्यवसाय करत नवी उभारी घेतली आहे. 


आज राज्यभरात बेरोजगारांची संख्या कमी नाही .मात्र अनेकजण हताश होऊन टोकाचं पाऊल उचलतात. मात्र काही तरुण तेच पाऊल उचलून नव्या अध्याय उभा करतात. खचून न जाता आयुष्याशी दोन हात केल्यानंतर माणूस यशस्वी होतो. याची अनेक उदाहरणे देखील आपल्यासमोर आढळतात. नोकरी सोडून व्यवसाय केला. नोकरी मिळाली नाही, म्हणून शेती केली. आणि यातून आपली प्रगती साधली. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील तरुणाने देखील नोकरीच्या प्रतीक्षेत दहा वर्ष घालविल्यानंतर कुक्कुटपालनाकडे वळाला. आणि तेथूनच खऱ्या आयुष्याला सुरवात झाली. 


नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील सापगाव येथील संदीप कचरे (Sandip Kachare) या युवकाची ही प्रेरणा गाथा. सर्व तरुणांच्या समोर आदर्श ठेवणारी आहे. साधारण 2012 च्या दरम्यान संदीपने डीएडला अॅडमिशन घेत शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यानंतर दोन वर्ष डीएड पूर्ण केले. मात्र त्यानंतर शिक्षक भरतीची वाट पाहू लागला. एक वर्ष गेलं, दोन वर्ष गेली, अशी जवळपास दहा वर्ष उलटून गेली. आता काहीतरी करावं लागेल. असा निश्चय करून, आत्मनिर्भर होऊन कुक्कुटपालन करण्याचे ठरविले. स्वतःच्या हिमतीवर कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला. कसलेही मार्गदर्शन आणि कसलीही माहिती नसताना त्याने हा व्यवसाय सुरू केला आणि आज चांगल्या पद्धतीने त्याचा हा व्यवसाय सुरु असून तो स्वतःच्या पायावर उभा आहे.


आज डीएड (Ded) होऊन त्याला दहा वर्षे झाली असून मोठ्या शिक्षक भरतीच्या तो प्रतीक्षेत आहे. त्याला नोकरी मिळाली नाही. सरते शेवटी त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा ठरवलं. साधारण दोन वर्षापासून त्याने स्वतःचा कुक्कुट पालन व्यवसाय सुरू केला असून तो कुटुंबाचे पालन पोषण करेल, इतपत कमावतो आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी हार न मानता आपल्या ज्ञानाचा, आपल्या कौशल्याचा उपयोग व्यवसायामध्ये दाखवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धाडस करावे. आपल्या मदतीला कोणी येणार नाही. आपल्यालाच करायचं आहे. एवढा निश्चय मनाशी ठरवून कामाला लागा असं त्याचे बेरोजगारांना सांगणे आहे.


रिस्क घेतल्याशिवाय शक्य नाही.... 


सुरुवातीला संदीप कचरे या तरुण शेतकऱ्याने 100 कोंबड्यांच्या पिल्लांपासून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. आजच्या घडीला हा व्यवसाय अडीच ते तीन हजार पक्षांचा बनला आहे. ज्यातून हा शेतकरी महिन्याकाठी चांगले पैसे कमवत आहे. संदीप कचरे म्हणाला कि, कुक्कुटपालनामध्ये सुरुवात 100 कोंबड्या पासून सुरुवात केली. 100 पक्षांच्या शेड साठी 10 हजार खर्च आला. त्यानंतर पक्षी घेण्यासाठी 2500 ते 3000 रूपये खर्च आला. पक्षांच्या खाद्यासाठी 5000 साधारण खर्च लागला. आणि ६ महिन्यानंतर अंडे उत्पादन चालू झाले. 100 कोंबड्या मागे 40-50अंडे रोजचे मिळतात. त्यानुसार आपला रोज चालू होतो. साधारण दिड ते 2 वर्षापर्यंत कोंबडी अंडे देते. असं सर्वसाधारण या व्यवसायाचे स्वरूप असत. आजच्या तरुण बेरोजगारांनी नोकरीच्या मागे न लागता काहीतरी व्यवसाय करणे आवश्यक आहे, मेहनत केल्याशिवाय कुठलीही गोष्ट सध्या होत नाही, त्यामुळे मेहनत करा, यश नक्की मिळेल, असेही तो म्हणाला.