Nashik Trimbakeshwer : वाढत्या उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी दरवर्षी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या (Sant Nivruttinath Mandir) संजीवन समाधीला आणि मंदिरातील विठुमाऊलीच्या मूर्तीला चंदनाचा शीतल लेप लावण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. आज रविवारी चैत्र वद्य एकादशी म्हणजेच वरूथिनी एकादशीस उटीची वारी संपन्न होत आहे. हजारो भाविकांनी संत निवृत्तीनाथांचे दर्शन घेतले आहे.
सद्यस्थितीत अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) उन्हाची तीव्रता देखील वाढत आहे. त्यामुळे नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात दुहेरी वातावरण नागरिकांना अनुभवायास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी सांप्रदायिक संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला उन्हाच्या दाहकतेपासून वाचविण्यासाठी चंदनाचा लेप लावण्याची परंपरा आहे. त्यास हजारो भाविक त्र्यंबक नगरीत (Trimbakeshwer) दाखल होत असून हा सोहळा उटीची वारी म्हणून प्रसिद्ध आहे. यासाठी दहा दिवस आधीपासूनच सुगंधी चंदनाची खोडं उगाळण्यास सुरवात होत असते. त्यासाठी महिला पुरुष विशेषत: महिला वर्ग अभंग म्हणत सहाणेवर उटी उगाळतात. त्यात सुगंधी वनौषधी द्रव्य घालुन तो लेप उटीच्या स्वरु पात रविवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान उटी चढविण्यास प्रारंभ होतो.
दरम्यान रात्री उशिरापर्यंत उटीचा लेप (Utichi Wari) समाधीवर असतो. नंतर मात्र उतरविला जातो. तोपर्यंत रात्रीचे एक दीड वाजतात. रात्री बारा वाजता उटी उतरविण्यास प्रारंभ होतो आणि उतरविलेली उटी उपस्थित वारकऱ्यांच्या अंगावर शिंपडली जाते. तोच प्रसाद म्हणुन भाविकांना दिला जातो. उटीच्या वारीसाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वर येथे येत असतात. नाशिक जिल्ह्यातुन अनेक दिंड्या टाळ मृदंगाच्या गजरात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला येथे येत असतात. सर्वत्र हरीनामाचा जयघोष सुरु असतो. उटीच्या वारीला मिनी निवत्तीनाथ यात्रा असेही म्हणतात. निवृत्तीनाथ समाधी मंदिर परिसरात जत्रा भरलेली असून तेथे हॉटेल्स, दुकाने खजुर पेढे केळी पेरु उसाचा रस आदींची दुकाने लावलेली आहेत. भाविकांना उटीचा प्रसाद
संत निवृत्तीनाथ मंदिर संस्थानमार्फत नामसप्ताहाचे आयोजन केले जाते. यावेळी सात दिवस रोज भाविक भक्त चंदन उगाळून त्याची उटी तयार करतात. एकादशीच्या दिवशी उटी संत निवृत्तीनाथ समाधीस लावली जाते. त्याच दिवशी रात्री या उटीचा प्रसाद सर्व वारकरी भक्तांना वाटण्यात येतो. यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी येथे जमतात. या उटीच्या प्रसादाने अनेक व्याधी, संसारीताप निवृत्त होत असल्याचा लोकांचा अनुभव आहे. यासाठी वारकऱ्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था संस्थानमार्फत पूर्वीपासून ठरवून दिलेल्या गांवामार्फत केली जाते. दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने तसेच संध्याकाळी रथोत्सवाने नगर प्रदक्षिणा करून या उत्सवाचा समारोप होत असतो.
म्हणून उटीची वारी म्हणतात...
संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला थंडगार सुवासिक चंदनाच्या उटीचा व विविध सुवासिक आयुर्वेदिक वनौषधींचा लेप चढविण्यात आला. तर उन्हाचा दाह या लेपानंतर शांत झाल्यानंतर रात्री बारानंतर तिच उटी उतरवली जाते. ती अंगावर पडल्यानंतर तच उटीचा प्रसाद होय. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला सुगंधी चंदनाच्या उटीसह विविध सुगंधी व थंडगार आयुर्वेदिक वनस्पतींचा चंदनाच्या उटीचा लेप लावण्यासाठी वरु थिनी एकादशीच्या दिवशी लेप चढवितात. त्यालाच उटीची वारी असे म्हणतात.