Nashik Crime : नाशिक शहरातील (Nashik) गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नसून गोळीबार, खून, प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांनी नाशिक शहर हादरत आहे. धार्मिक नगरी म्हणून असलेल्या नाशिक शहरात गुन्हेगारीने कळस गाठला असून अशातच शहरातील सराईत गुन्हेगार असलेल्या तसेच भाजपचा पदाधिकारी असलेल्या राकेश कोष्टीवर (Rakesh Koshti) गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात तो गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 



नाशिक शहर गुन्हेगारीचं (Crime) केंद्र बनत चाललं असून कायदा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यात पूर्ववैमनस्यातून कधी किरकोळ कारणातून मारहाण, प्राणघातक हल्ले होते आहेत. काही दिवसापूर्वी कोयता गँगची (Koyata Gang) दहशत पसरली होती. आता गोळीबाराच्या (Gun Fire) घटना सर्रास घडू लागल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आज सकाळी नवीन नाशिक परिसरातील बाजीप्रभू चौकात अज्ञात संशयितांनी सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर गोळीबार केला. यात कोष्टी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 


दरम्यान, गोळीबार झाल्याची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरु केला आहे. तर लागलीच काही वेळात एका संशयिताला ताब्यात देखील घेण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा हा सराईत गुन्हेगार आहे. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून जया दिवे असे नाव आहे. त्याचबरोबर मुख्य हल्लेखोरासोबत असलेल्या आणखी काही त्याच्या साथीदारांचे देखील नाव निष्पन्न झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त यांनी दिली आहे. या गोळीबाराच्या घटनेत भाजप पदाधिकारी राकेश कोष्टी जखमी झाले आहेत. या घटनेने नाशिक शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


राकेश कोष्टी हा भाजपचा पदाधिकारी 


नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या भरवस्तीत ही गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संशयित हल्लेखोरांकडून दोन राउंड फायर करण्यात आले असून त्याच्या केस (काडतूस) देखील पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला तो भाजप कामगार आघाडीचा शहराध्यक्ष असल्याचे समजते. या घटनेची माहिती पसरतातच भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.


राकेश कोष्टीवर अनेक गुन्हे दाखल 


गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या राकेश कोष्टीच्या पोटाला गोळी लागल्याचे देखील प्राथमिक माहिती मिळाली आहे. एका खाजगी रुग्णालयात कोष्टीवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून या प्रकरणाचा पुढील तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. सराईत गुन्हेगार राकेश कोष्टीवर पंचवटी, नाशिकरोड, गंगापूर, पंचवटी या पोलिस ठाण्यांत चार खुनाच्या गुन्ह्यांसह खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, कट रचणे, लुटमार, हाणामारी, सरकारी कामात अडथळा आदी गंभीर स्वरूपाचे पंधरा ते वीस गुन्हे विविध पोलिस ठाण्यांत दाखल आहे. तसेच आरोपींना 24 तासाच्या आत अटक करण्यात येईल अशी देखील माहिती पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली आहे.