Nashik Shrikant Shinde : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जेवणावर तीन महिन्यात तब्बल दोन कोटी 38 लाखांची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. मात्र वर्षा निवासस्थानी जो खर्च झाला आहे तो आमच्या परिवाराचा नसल्याचे स्पष्टीकरण खासदार श्रीकांत शिंदे (Shreekant Shinde) यांनी दिले आहे. 


खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिकमध्ये (Nashik) खासदार रोजगार मेळाव्याच्या (Rojgar Melava) कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.  तीन महिन्यात तब्बल दोन कोटी 38 लाखांची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.  यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले होते. यावर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 


श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले कि, राजकारणाचा स्तर खालावला आहे, कशा प्रकारच्या टीका करायच्या हे देखील समजलं पाहिजे. वर्षा या निवासस्थानी जो खर्च झालाय तो आमच्या परिवाराचा खर्च नाही. महाराष्ट्रातील जे नागरिक मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी येतात, त्यांच्या चहा पाण्यावर खर्च होतो. डेव्हलपमेंटचं राजकारण केलं पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री च्या पद्धतीने काम करता ते बघून विरोधकांचे पाय घसरत चालले आहे. तर ते काय करतील त्यांच्या पक्षासाठी, त्यांच्या गटासाठी तो त्यांचा प्रश्न असून मला त्यावर बोलायचं नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचे शिंदे यांनी टाळले. 


यावेळी कांदा प्रश्नावर श्रीकांत शिंदे म्हणाले कि, मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्ये कांद्याच्या बाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि सर्व कांदा उत्पादकांच्या मागे मुख्यमंत्री खंबीर उभे आहेत. कांदा उत्पादकांच्या मागे राहून त्यांच्या समस्या सोडविण्यात येईल. दादा भुसे (Dada Bhuse) हे आंदोलकांशी बोलले असून कांदा उत्पादक जर भेटले तर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हणाले. तसेच निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या प्रक्रियेत आणि अनुषंगाने जे जे निर्णय पक्ष म्हणून आम्हाला घेता येतील ते आम्ही घेऊ असेही ते म्हणाले. 


नाशिकमध्ये रोजगार मेळावा 


शिवसेना, युवा सेने प्रमुख खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शहर परिसरात अनेक कार्यक्रम घेण्यात आले. खासदार हेमंत गोडसे यांनी सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी 200 कोटी रुपयांच्या कर्ज वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. कालिदास कलामंदिर येथे 12 हजार पाचशे सुशिक्षित बेरोजगार युवकांना विविध महामंडळाच्या योजनेतून राष्ट्रीयकृत बँकेमार्फत सुमारे 200 कोटी रुपये व्यावसायिक कर्ज वितरण करण्यात आले.