Nashik Corona Update : नाशिक जिल्ह्याची चिंता वाढली! येवला तालुक्यात एकाच दिवशी चार कोरोनाबाधित आढळले
Nashik Corona Update : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एकाच दिवशी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
Nashik Corona Update : एकीकडे भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 Influenza) विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली असताना दुसरीकडे नाशिककरांच्या चिंतेत भर पडणारी बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला (Yeola) तालुक्यात एकाच दिवशी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
गेल्या महिनाभरापासून राज्यासह देशभरात सर्दी-खोकल्याचे रुग्ण झपाट्याने वाढत असून कोरोना सारखी लक्षणे दिसत असल्याने राज्य शासनाची आरोग्य यंत्रणा ॲलर्ट झाली आहे. अशातच कोरोना रुग्णसंख्या (Corona) कमी झालेली असताना येवला तालुक्यात एकाच दिवशी चार कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण देखील सर्दी खोकला आंतर इतर आजच्या निदानासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी आले असता त्यांच्या आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यामध्ये चार रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले आहेत.
सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR नं हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. H3N2 इन्फ्लूएंझाचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्टवर आहे. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा, रुग्णांचं बारकाईने निरीक्षण करावं, असं सांगितलं आहे. अशातच नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) कोरोना रुग्णसंख्या कमी असली तरी आरोग्य यंत्रणेकडून आरटीपीसीआर तपासण्या सुरू आहेत. दरम्यान काल रोजी जिल्हाभरात तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये येवला तालुक्यात एकूण 48 तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये चार रुग्ण हे कोरोना पॉसिटीव्ह (Corona Positive) आढळून आले आहेत. हे रुग्ण सर्दी खोकला, कुणी डिलिव्हरीसाठी आलेले रुग्ण होते. मात्र सुरवातीला आरटीपीसीआर करणे आवश्यक असल्याने आरोग्य प्रशासनाने तपासणी केल्यानंतर हे चार रुग्ण पॉसिटीव्ह आढळून आले आहेत.
वैद्यकीय विभाग पुन्हा ॲक्शन मोडमध्ये....
नाशिक शहरात मागील चार-पाच दिवसात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे वैद्यकीय विभाग पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आला आहे. ज्या भागात रुग्ण आढळला तेथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून दररोज तीनशे ते चारशे चाचण्या केल्या जात आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेला देखील सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेकडून संभाव्य तयारी सुरू झाली असतानाच मागील चार- पाच दिवसात सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने वैद्यकीय विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. त्यानुसार ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तेथे तातडीने चाचण्या सुरू झाल्या आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.
अशी घ्या काळजी ....
दरम्यान सद्यस्थितीत देशभरात H3N2 विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. हे टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मास्क घालण्याचा, हात वारंवार धुण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. IMA ने संक्रमित व्यक्तीला अँटीबायोटिक घेणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील सर्दी खोकला आजारचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहते यांनी नागरिकांना हात नियमितपणे स्वच्छ धुवा. विशेषत: टायलेट नंतर, जेवणाआधी तसेच चेहरा किंवा नाकाला स्पर्श करण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवा. शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. आजारी व्यक्तींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.