Nashik News : गेल्या काही दिवसापासून सतत कांदा दर (Onion Rate) दरात घसरण होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे सातत्याने शेतकऱ्यांकडून आंदोलन होत आहे. त्यानंतर आज नाशिकच्या (Nashik) उपजिल्हाधिकारी कार्यालयात रयत क्रांती संघटनेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आलं. कांदा अन् भाकर सोडून जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. 


आज सकाळीच देखील लासलगाव (Lasalgaon) येथील बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. त्यानंतर रयत क्रांती संघटनेच्या (Rayat Kranti Sanghtana) वतीने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात (Nashik Collectro Office) निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या सहा पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्या समोरच खाली बसत कांदा फोडून कांदा-मिरची-पोळी खाऊन आंदोलनाला सुरुवात केली. जोपर्यंत कांद्याच्या भावाबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले. 


कांद्यासह इतर पिकांच्या भावात सातत्याने होत असणाऱ्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तर कांद्याच्या भावाने अक्षरशा रडवले आहे. कांद्याचे दर वाढल्यानंतर केंद्र सरकारकडून तात्काळ महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठवले जातात आणि कांद्याची निर्यात बंद करून कांदा परदेशातून आयात केला जातो. मात्र आता कांद्याच्या भावात घसरण झाल्यानंतर केंद्र सरकार गप्प असल्याने कांदा उत्पादक शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहेत.


आज जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी संघटनेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. नाशिकच्या निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा दालनात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. या शेतकऱ्यांनी कांदा भाकर हातात घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला. रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक पगार म्हणाले कि, पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सुरू असलेलं रयत क्रांती संघटनेचं आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आलं आहे. उद्या नाही तर परवा रयत क्रांतीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून दिली जाईल आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांना दिले आहे.   


आमच्या पोरींना स्थळ शोधा आणि लग्न करुन द्या; महिलेची उद्विग्न प्रतिक्रिया


सिन्नर येथील वडगावमधील शेतकरी महिला नीता वाजे म्हणतात की, कांद्याला भाव नाही, आम्ही काय करायचं. सरकारने शेतकऱ्यांचा जीव घ्यायचं ठरवलंय का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याकडे लक्ष द्या,आम्ही वावर गहाण ठेवून कर्ज काढलं, अन् लागवड केली, आता मरायची वेळ आली आहे, पाच मुली लग्नाच्या आहेत, कशी करायची लग्न, आमच्या पोरींना स्थळ शोधा आणि लग्न करुन द्या असा सवाल शेतकरी महिलेने उपस्थित केला आहे.