Nashik Crime : एकीकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग (Excise Department) धडक कारवाया करत असताना दुसरीकडे गुन्हेगार (Crime) राजरोसपणे बनावट देशी दारूची निर्मिती करत असल्याचा प्रकार उत्पादन शुल्क विभागाने हाणून पाडला आहे. नाशिकच्या सिन्नर (Sinner) तालुक्यातील निऱ्हाळे येथील बनावट देशी मद्य निर्मिती करणारा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने उध्वस्त केला आहे.  


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे गावात घोटेवाडी रस्त्यावरील एका बंगल्यात बनावट देशी दारूचा कारखाना चालवला जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक शशिकांत गजे, उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल यादव यांचे मालकीचे निऱ्हाळे गावातील बंगल्यावर तसेच सिन्नर शहरातील धनलक्ष्मी अपार्टमेंट येथे एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान निऱ्हाळे येथील बंगल्यात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना चालवण्यात येत असल्याचे उघडकीस आले. 


त्यानुसार पथकाने दोन्ही ठिकाणी कारवाई करत एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकास अटक केली आहे. यावेळी प्लॅस्टिक गोण्यांमध्ये रिकाम्या बाटल्या, एक लोखंडी कटर, प्लॅस्टिक टेप, कागदी नोंदवही, स्पायनर बायडिंग पाकिटे, झेरॉक्स पेपर, देखरेखीसाठी लावण्यात आलेला सी.सी.टी.व्ही, डीटीडीआर, इपसन कंपनीचे प्रिंटर मशीन, एलजी कंपनीचे संगणक सी.पी. यू. आयबॉल कंपनीचे संगणक मॉनिटर असा एक लाख आठ हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 


सदर कारखाना चालवणारा संशयित प्रफुल यादव ऊर्फ पप्पू यादव यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक जे. एस. जाखेरे, दुय्यम निरीक्षक आर. व्ही. राऊळ, यशपाल पाटील, जवान सुनील दिपोळे, धनराज पवार, राहुल पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली. अवैध मद्य निर्मिती विक्री वाहतूक या संदर्भात कोणती तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक त्याचबरोबर व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.


कारखान्याबाहेर सीसीटीव्ही तैनात 


निऱ्हाळे गावातील सदर कारखान्यावर चार वर्षांपूर्वीही उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून कारवाई केली होती. या कारवाईत बनावट देशी दारूचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला होता. याशिवाय बनावट देशी दारू बनवण्यासाठीचे केमिकल्स, रिकाम्या बाटल्या व इतर साहित्य देखील जप्त करण्यात आले होते. बनावट कारखाना बंगल्याच्या तळघरात छुप्या पद्धतीने चालवला जात होता. बाहेरून या परिसरात कोणी आल्यास आतील व्यक्तींना सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांच्याबाबत  माहिती मिळायची. या तळघरात जाण्यासाठी एका खोलीत ठेवलेल्या कॉटच्या खालून छुपा जिना काढण्यात आलेला होता.