नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडून पाठींबा मिळवण्यासाठी अनेक नेते अंतरवाली सराटीत दाखल होत आहे. आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने नरहरी झिरवाळ यांना दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून (Dindori Assembly Constituency) उमेदवारी दिली आहे. दिंडोरी हा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुनीता चारोस्कर (Sunita Charoskar) यांना रिंगणात उतरवले आहे. तर या मतदारसंघात महायुतीमध्ये माजी आमदार धनराज महाले (Dhanraj Mahale) यांना शिवसेना शिंदे गटाने अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. तर नरहरी झिरवाळ यांनी विविध घटकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. झिरवाळ शुक्रवारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते.
भुजबळांचा जरांगेंना टोला
या भेटीबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. निवडणुकीसाठी सर्वच जण भेटत असतात. त्यांना वाटते भेटल्याने आपल्याला फायदा होईल. पण आता पूर्वीसारखी कोणाची मक्तेदारी राहिली नाही, असा टोला छगन भुजबळ यांनी यावेळी मनोज जरांगे पाटलांना लगावला.
मतदार सुज्ञ झालाय
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, आता एका घरात चार वेगवेगळ्या विचाराचे, पक्षाचे लोक काम करत असतात. मतदार हे वैचारिक झाले आहेत. विचारधारा ही पक्षाच्या स्तरावर असते तिथे सर्व गोष्टी तपासल्या जातात. याचा विचार करून लोक योग्य ठिकाणी मतदान करतात. मतदार सुज्ञ झाला आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल माध्यमे यामुळे मतदार सुज्ञ झाले आहेत. त्यांना सर्व कळतं मत कोणाला दिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या