Chhagan Bhujbal : प्रत्येक मतदारसंघात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बंडखोरी आहे. सरासरी 30 उमेदवार रिंगणात आहेत. उद्या 4 वाजेपर्यंत खरे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरवात होईल असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी केलं. सर्वच समाजाचे उमेदवार माझ्या विरोधात रिंगणात उभे आहे. त्यामूळं एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात काही अर्थ नाही असेही भुजबळ म्हणाले. माझ्या सर्व विकासकामांमध्ये मराठा, दलित, आदिवासी, ओबीसी सर्व समाज सोबत असल्याचेही ते म्हणाले.


 सर्वच जाती धर्माचे लोक मला मतदान करतील 


केलेल्या विकास कामांमुळं मला खात्री आहे सर्वच जाती धर्माचे लोक मला मतदान करतील असे भुजबळ म्हणाले. त्यापुढं जावून सर्व पक्षाचे लोक देखील छगन भुजबळ म्हणून मला मतदान करतात असेही भुजबळ म्हणाले. बंडखोरी हा निवडणुकीचा एक भाग आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका यासह सर्वच निवडणुकीत देखील बंडखोरी होत असते असेही भुजबळ म्हणाले. सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. निवडणुकीसाठी सर्वचजण भेटत असतात.त्यांना वाटते भेटल्याने आपल्याला फायदा होईल. पण आता पूर्वीसारखी कोणाची मक्तेदारी राहिली नाही, असा टोलाही मनोज जरांगेना त्यांनी लगावला. आता एका घरात चार वेगवेगळ्या विचाराचे, पक्षाचे लोक काम करत असतात. मतदार हे वैचारिक झाले आहेत. विचारधारा ही पक्षाच्या स्तरावर असते तिथे सर्व गोष्टी तपासल्या जातात असे मनोज जरांगे म्हणाले. याचा विचार करुन लोक योग्य ठिकाणी मतदान करतात.मतदार सुज्ञ झाला आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल माध्यमे यामुळे मतदार सुज्ञ झाले आहेत. त्यांना सर्व कळतं मत कोणाला दिले पाहिजे असेही भुजबळ म्हणाले. 


येवला मतदारसंघाबद्दल माहिती


येवला मतदारसंघ हा सुरुवातीला काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर शिवसेनेने या ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. 2004 साली छगन भुजबळ यांनी येवल्यात एन्ट्री घेतली. मंत्री भुजबळ यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून येवला मतदारसंघाची ओळख झाली. गेल्या चार पंचवार्षिकपासून भुजबळ येवल्याचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. 2004 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार कल्याणराव पाटील यांचा पराभव केला होता. भुजबळ यांना 79 हजार 306 तर कल्याणराव पाटील यांना 43 हजार 657 मते मिळाली होती. 2009 मध्ये भुजबळ यांनी 1 लाख 6 हजार 416 मतं मिळवत शिवसेनेच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला. 2014 सालच्या निवडणुकीत 1 लाख 12 हजार मिळवत छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. पवार यांना या निवडणुकीत 66 हजार 345 मते मिळाली. तर 2019 मध्ये भुजबळ यांनी पुन्हा शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. या निवडणुकीत भुजबळ यांना 1 लाख 26 हजार 237 मते मिळाली. तर पवार यांना 69 हजार 712 मते मिळाली होती.