बारामती : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पोलीस दलाच्या वाहनातून निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात असल्याचा गंभीर आरोप केला. या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पोलिसांवरच आरोप केलाय.
अजित पवार आज बारामती तालुक्यात गावभेट दौरा करीत आहेत. शिर्सुफळ गावातील नागरिकांशी बोलताना अजित पवारांनी पोलिसांवर आरोप केलाय. अजित पवार म्हणाले की, सोयाबीनचा दर वाढला की तेलाच्या किंमती वाढतात. बारामतीत मी गुन्हेगारी वाढवू दिली नाही. ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी मला चिठ्ठ्या येतात. दादा दारू भट्टी बंद करा. दारूचे धंदे बंद झाले तर बहिणी तुम्हाला आशीर्वाद देतील. बारामती पोलिसांचा स्टाफ बदला. गरीबाचे काम करत नाही. बारामतीचे पोलीस गरिबांची काम करत नाहीत पैसे घेऊन शांत बसतात, असे सांगितले जाते. आचारसंहिता संपल्यावर संबंधितांना सांगतो. मी पहाटेच कामे बघायला जातो तिथं गेल्यानंतर सकाळी लवकर येतो आणि बघतो. जर कोण दिसेल त्या पोलिसाला सस्पेंड करतो. पोलिसांना हप्ते जातात त्यामुळे पोलीस कारवाई करत नाहीत, असा आरोप अजित पवार यांनी केलाय. पोलिसांना आम्ही 25 कोटी गाड्या घ्यायला दिले. पोलीस हप्ते घेतात आणि त्यातलं काही हप्ता मला येतोय असेही काही नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
आता माझा विचार करा : अजित पवार
अजित पवार पुढे म्हणाले की, लोकसभेला तुम्ही साहेबांचा विचार केला आता माझा विचार करा. 23 वर्ष साहेब तुमचे आमदार होते मी 33 वर्षे झाले तुमचा आमदार आहे. जानाई शिरसाई योजना मी पद्मसिंह पाटील हे मंत्री असताना मंजूर करून घेतली. पुरंदर उपसा सिंचन योजना दादासाहेब जाधवराव यांना विचारा कोणी मंजूर केली. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. कामे आकाशात पडणार नाहीत ना? कुणीतरी ठेकेदार पाहिजे ना? काम खराब झालं तर सांगा ना. पण असे बोललं की वाईट वाटत. कामे कुणाला तरी द्यावी लागतील ना? उगाच मलिदा मलिदा म्हणायचं. वाईट वाटून घेऊ नका. रेल्वेचे काम खासदाराकडे असतं. त्यामुळे ते काम त्यांना सांगा. ज्याचं काम त्याला सांगा. खासदाराला तुम्ही निवडून दिल आहे. सुनेत्राला वरून बसवलं आहे. मी राज्यात काम करतो. अस म्हणताच एकच हशा पिकाला. गंमतीचा भाग सोडा पण एक पत्र सुप्रियाला द्या, एक सुनेत्राला द्या, असेही त्यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Pune Crime: दिवाळीत नकली पिस्तूल दाखवून पसरवली दहशत; दोघांना पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?