Akole Long March : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले येथून आज दुपारी तीन वाजता किसान सभेचा लॉंग मार्च (Long March) निघणार आहे. या मार्चला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. अजित नवले यांना पोलिसांनी तशी नोटीसही बजावलेली आहे. अकोले पोलिसांकडून मोर्चेकरांना 149 ची नोटीस बजावण्यात आलेली आहे. किसान सभा मात्र आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळे आज तीन वाजेपासून लॉन्ग मार्चला सुरुवात होणार आहे.
शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मागणीसाठी आज पुन्हा शेतकरी किसान सभेचा (Kisan Sabha Long March) लॉन्ग मार्च निघत आहे. आज दुपारी तीन वाजता अकोले ते लोणी या लॉग मार्चला सुरुवात होणार आहे. मात्र या लॉंग मार्चसाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत वाढलेल्या उन्हामुळे हा निर्णय घेतला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. खारघरच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विनंती केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान मोर्चा निघायला अजून वेळ असून आमची चर्चा सुरु राहिल. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यास मोर्चा स्थगित करण्याची आंदोलकांची तयारी असल्याचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी माहिती दिली आहे.
सरकारचा बुरखा फाडायला शेतकरी रस्त्यावर उतरलाय
दरम्यान किसान सभेचे अजित नवले (Ajit Nawale) म्हणाले कि, शेतकऱ्यांच्या या पोरांचं हृदय शेतकरी बापासाठी तीळतीळ तुटलेला आम्ही पाहिलेले आहे. त्यामुळे पोलीस हे आमचे दुश्मन नाहीत, ते त्यांचं काम करत आहेत. त्यांनी ते करावं. सरकारला मात्र आम्ही उन्हात चालण्याची खूपच चिंता वाटायला लागलेली आहे. मात्र शेतकरी मायमाऊल्या आणि शेतकरी आयुष्यभर उन्हात काम करतात. उन्हात तळपून तयार केलेल्या कांद्याला आज 300 ते 400 रुपये भाव मिळत आहे. त्या उन्हात कष्ट केलेला काम केलेल्या माऊलीच्या घामाला दाम नाही, याची मात्र सरकारला चिंता वाटत नाही. त्यावेळी शेतकऱ्यांच्या उन्हाची त्यांना आठवण येत नाही. आज मात्र त्यांचा बुरखा फाडायला शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे.
दरम्यान आता उन्हाचं कारण पुढे देत मोर्चा स्थगित करण्यास सांगण्यात येत आहे. मात्र आम्ही सर्वांच्या सूचनेचा आदर करतो. शेतकऱ्यांच्या जीवाची नक्कीच आम्हालाही चिंता आहे. त्यामुळे तीन वाजेनंतर चालण्याचा, रात्रीचा उपयोग करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. केवळ फार्स करायचा, आमची समजूत काढण्यासाठी बैठका घेतल्या जातात, त्या बैठकांमध्ये अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना जर गांभीर्य नसेल सरकारला गांभीर्य नसेल तर अशा मंत्र्यांच्या आणि कारभारावर विश्व ठेऊन मोर्चा स्थगित करण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता, त्यामुळे या पार्श्वभूमीवर बैठक घेत सर्वांच्या एकमताने मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लॉन्ग मार्चमध्ये चुली पेटल्या
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून आज दुपारी तीन वाजता किसान सभेचा लॉंग मार्च निघणार आहे लॉंग मार्चला सुरुवात होण्यापूर्वी आंदोलकाच्या जेवणाची तयारी सुरु झाली आहे आहे. त्याच ठिकाणी उघड्यावर स्वतः आंदोलकांनी चूल पेटवून किराणा आणून जेवणाची तयारी सुरु केली आहे. वरण-भात आणि वांग्याची भाजी असा बेत आजचं आंदोलन सुरु होण्यापूर्वी आंदोलकांनी केलेला असून या ठिकाणी जेवण केल्यानंतर दुपारी तीन वाजता हे आंदोलन अकोल्यातून लोणीकडे मार्गक्रमण करतील.