Ahmednagar Radhakrishna Vikhe : गेल्या 64 वर्षांपासून संगमनेर बाजार समितीवर (Sangamner Bajar Samiti) तुमची सत्ता आहे. या 64 वर्षात संगमनेर बाजार समितीमध्ये काय बदल केला? शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल करत तुम्ही काय केलं ते सांगा? मी राहातामध्ये काय केलं ते सांगतो, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा व्हिडीओ का नाही बनवला? कायम सोयीचे राजकारण करत असल्याची घणाघाती टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे. 


सद्यस्थितीत नाशिकसह (Nashik) अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) बाजार समित्यांची निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. बाजार समित्यांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेते प्रचारासाठी रणांगणात उतरले आहेत. संगमनेरमध्ये बाजार समिती निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार दौरा सुरु आहे. अशातच संगमनेरमध्ये बाजार समिती निवडणूक प्रचारसभेत विखे यांनी थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राहता तालुक्यात महाविकास आघाडी असून संगमनेरमध्ये शेतकरी आघाडी आहे. मग राहतामध्ये महाविकास आघाडी असताना संगमनेरमध्ये का नाही? असा सवाल उपस्थित करत थोरातांना धारेवर धरले. 


'बाजारसमिती दलालांच्या ताब्यातून काढून शेतकऱ्यांकडे द्यायचीय'


प्रचारसभेत बोलताना विखे म्हणाले की, मी अहमदनगर जिल्ह्यात मागील सात महिन्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय आणले. धनगर समाजसाठी शेळी मेंढी प्रकल्प आणला. विशेष म्हणजे वाळू धोरण तयार केले. लवकरच शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीचे नकाशे घरपोच देणार आहे. थोरात यांच्याकडे अनेक वर्ष मंत्रिपद होते, त्यावेळी तुमच्याकडे मंत्रिपद असताना नगर जिल्ह्यात काय केले? असा सवाल उपस्थित केला. बाजार समिती निवडणूक ही व्यक्ती विरोधात नाही, प्रवृत्ती विरोधात आहे. त्यामुळे संगमनेरची बाजार समिती दलालांच्या ताब्यातून काढून शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यायची आहे. संगमनेरमधील जनता परिवर्तनसाठी सज्ज झाली असल्याचे ते म्हणाले. 


कायम सोयीचे राजकरण, विखेंची थोरातांवर टीका


विखे पुढे म्हणाले की, शिवसेनेचे नेते लाचार आहेत, मेळाव्याच्या कार्यक्रमाला फोटो नसताना ते मेळाव्याला जातात. विधानपरिषद निवडणूक आली, तेव्हा हात बांधले, निवडणूक संपली हात सोडले. त्यांच्या हाताला लागले होते ना? तोंडाने का नाही बोलले, असे सांगत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा व्हिडीओ का नाही बनवला? कायम सोयीचे राजकारण करत असल्याची टीका विखे यांनी केली. पुढे म्हणाले की, तालुका तुमची जहागीर आहे का? तालुक्यावर तुमचे नाव आहे का? ज्यावेळी महसूलमंत्री तुमच्या तालुक्यात होते, तुम्हाला वाळू कमी किमतीत मिळाली का? आज आम्ही 800 रुपये वाळू घरपोच देत आहोत. आपण सात वर्ष महसूलमंत्री होते, माफियाराज का नाही संपवले? शिवाय संगमनेर बाजार समितीला 64 वर्ष झाले, आज बाजार समितीवर 1 कोटी रुपयांचे कर्ज आहे, याच उत्तर द्या, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर केला.