Kisan Sabha Protest नाशिक : माकप आणि किसान सभेचे गेल्या सहा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Nashik Collector Office) आंदोलन सुरु आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला आहे. मात्र लेखी आश्वासन मिळालेले नसल्याने शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आज किसान सभा (Kisan Sabha Protest) मोर्चा प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्यात दोन बैठका आयोजित करण्यात आल्या. मात्र दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या आहेत.


वनजमीन हक्काच्या विविध तीन मुद्यांसह कांद्याचा हमी दर, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, आशा व अंगणवाडी सेविकांना किमान वेतन लागू करण्याच्या मागणी अशा विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी सुरगाणा ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर दहा हजार आदिवासी व शेतकरी बांधवांचा मोर्चा आला होता. सोमवारी हा मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 


सोमवारी पुन्हा बैठक


आज किसान सभा मोर्चा प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्यातील दोन बैठका फिस्कटल्या आहेत. बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. मोर्चेकरी आंदोलनावर ठाम आहेत. काल झालेल्या बैठकीचे प्रोसिडिंग सादर करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट काहीच सादर केले नसल्याने आंदोलनकर्ते आंदोलनावर ठाम आहे. जोपर्यंत अंमलबजावणी सुरू होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हटणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे. आता सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत पुन्हा बैठक होणार आहे. सोमवारी बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.


स्मार्ट रोड जाम


आंदोलकांनी ठाण मांडल्यामुळे शहराचा मुख्य स्मार्ट रोडच जाम झाला आहे. याच मार्गावर कोर्ट, जिल्हाधिकारी कार्यालय आहे. त्यामुळे नागरिकांना याठिकाणी ये-जा करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने आंदोलकांच्या आरोग्याच्या समस्येत वाढ होताना दिसून येत आहे.


विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय


दरम्यान सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. हे सर्व कमी म्हणून की काय अचानक सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनीही संपाची हाक दिल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठीच गैरसोय झाली. विद्यार्थ्यांना आणून घालण्यासाठी पालकांना स्वतः यावे लागत असल्याचे चित्र आहे.


इतर महत्वाच्या बातम्या