मालेगाव : सिराज मोहम्मद व गँगने मालेगावात (Malegaon Money Laundering Case) हिंदू तरुणांना फसवून त्यांच्या नावे बोगस कंपन्या स्थापन करीत 100 कोटी रुपये मागविले. या प्रकरणाची 1000 कोटीपेक्षा जास्त व्याप्ती असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वतः 11 डिसेंबर रोजी या तरुणांची भेट घेणार असल्याची माहिती भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मालेगावात दिली. तसेच सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांच्यासह विविध मुस्लिम संघटनांना 100 कोटी रुपये 'व्होट जिहाद'साठी देण्यात आले असा देखील गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी आज मालेगावात नामको बँक आर्थिक गैरव्यवहारात 100 कोटी फसवणूक झालेल्या तक्रारदार व तरुणांची यांची भेट घेतली. तत्पूर्वी सोमय्या यांनी मालेगाव अपर पोलीस अधीक्षक यांची भेट घेवून या घोटाळ्यातील तपासाबाबत बंद दाराआड चर्चा केली. तर नाशिक मर्चंट बँक व महाराष्ट्र बँकेला भेट देवून किरीट सोमय्यांनी माहिती घेतली.
किरीट सोमय्यांचा सज्जाद नोमानींवर गंभीर आरोप
यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, नामको बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून काढण्यात आलेली 114 कोटी रुपयांची रक्कम व्होट जिहादचा प्रचार व प्रसार करणाऱ्या सज्जाद नोमानी यांच्यासह मराठी मुस्लिम सेवा संघ, मुस्लिम उलेमा बोर्ड यांना वितरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तर हे पैसे मालेगावातून गेल्याचेही सोमैया यांनी सांगितले आहे.
27 खात्यातून जमा झाले 114 कोटी
हा घोटाळा 1000 कोटींचा असून 600 कोटी रुपये दुबई येथे गेलेत. तर काही रक्कम बँकेतून काढण्यात आली आहे. 100 कोटी रुपये ऑक्टोबरमध्ये व्होट जिहाद अभियान चालवणाऱ्या लोकांच्या खात्यावर गेले. बँक ऑफ महाराष्ट्रने या संबंधात कारवाई केलेली नाही. 14 लोकांच्या खात्यातून सिराज मोहम्मद, अक्रम मोहम्मद नातानी, शेख शहाबाज, जाफरभाई नबिमुल्ला, अमीन वाघरिया, अब्दुल कादीर भगाड, असे 27 सिराज मोहम्मद अँड गँगच्या खात्यातून 114 कोटी जमा झाले, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार
दरम्यान, या प्रकरणात केंद्रीय गृह मंत्रालय, ईडी, सीबीआय, फायनान्स, इंटेलिजन्स ब्यूरो, महाराष्ट्र पोलीस यांनी तपास सुरू केला आहे. पुढील काळात महाराष्ट्र स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा