मुंबई : मालेगावमधील 100 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा मुख्य सूत्रधार महमूद भगड हा देश सोडून पळून गेल्याची माहिती आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महमूद भगड असल्याची माहिती ईडीली मिळाल्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी सुरू होती. याची माहिती लागताच तो देश सोडून गेला. महमूद भगड हा चॅलेंजर किंग या नावाने प्रसिद्ध होता. त्याच्या विरोधात ईडीकडून आता लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. महमूद भगड हा मूळचा गुजरातचा आहे.


मालेगाव मनी लाँड्रिंग प्रकरणातील आणखी एक आरोपी सिराज मोहम्मदला ईडीने अटक केली होती. त्याच्याकडून या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराची माहिती ईडीला मिळाली होती. त्यानंतर ईडीने कारवाई करण्याची तयारी सुरू करताच महमूद भगड याने देश सोडला. 
 
सिराज मोहम्मदवर 14 बनावट बँक खाती उघडण्याचा आणि भारतभरात 21 अतिरिक्त खात्यांद्वारे निधीच्या हेराफेरीचा आरोप आहे. ईडीने भागड विरुद्ध लूकआउट नोटीस (LOC) जारी केले आहे आणि त्याच्या मनी ट्रेल फूटप्रिंटची चौकशी करण्यात येत आहे.


दुबईतील कंपन्यांमध्ये पैसे हस्तांतर


तपासादरम्यान, ईडीला मनी लाँड्रिंगशी निगडीत 100 कोटी रुपयांव्यतिरिक्त आणखी एक मनी ट्रेल सापडले असून त्यामध्ये सुमारे 4 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर निधीचाही समावेश आहे. नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (NAMCO Bank) 14 बनावट खात्यांमधून हे पैसे काढण्यात आले आहेत. सिराज मोहम्मदशी संबंधित दुबईस्थित पाच कंपन्यांमध्ये हे पैसे हस्तांतरित करण्यात आल्याचं समोर आलं आहे.


सिराजच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या दुबईस्थित पाचही शेल कंपन्या फरार मास्टरमाइंड मेहमूद भागड उर्फ ​​चॅलेंजर किंग याच्या असल्याचा संशय ईडीला आहे. 


अनेक शहरात शेल कंपन्यांची निर्मिती


मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली. या प्रकरणातील फरार आरोपी महमूद भगड याने एक गुंतागुंतीचे नेटवर्क तयार केलं होत. त्यासाठी नागनी अकरम मोहम्मद शफी आणि वली मोहम्मद भेसनिया या दोन लोकांचा वापर केला. या दोघांनाही 35,000 पगार देण्यात येत होता. या दोघांनी नवी मुंबई, नाशिक, सुरत, अहमदाबाद, उत्तर प्रदेश, राजकोट, छत्तीसगड आणि दिल्ली यांसारख्या शहरांमध्ये अल्पावधीत अनेक शेल कंपन्या स्थापन करण्यात हातभार लावला होता.


चौकशीदरम्यान शफीने या संपूर्ण ऑपरेशनचा मास्टरमाइंड मेहमूद भगड असल्याचं कबुल केलं. सिराज मोहम्मदच्या अटकेनंतर भगडने शफीला आपण आधीच देश सोडून पळून गेल्याचे सांगितले असल्याचे सूत्रांकडून समजते. शिवाय, त्याने शफीलाही देशाबाहेर जाण्याची सूचना केल्याचं समोर आलं. त्यानंतर शफीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अहमदाबाद विमानतळावर एजन्सीने पकडले.


300 हून अधिक खाती आणि अनेक बनावट कंपन्या


ईडीच्या तपासातून समोर आले आहे की,महमूद भगडच्या निर्देशानुसार शफी आणि भेसनिया यांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी 300 हून अधिक बँक खाती आणि अनेक बनावट कंपन्या उघडल्या होत्या. तो शफी, मामू, मोईन खान, इस्माईल खान, सलमान शकील मिर्झा आणि मोहम्मद साजिद मोहम्मद अशा विविध नावांनी अनेक राज्यांमध्ये मनी लाँड्रिंग करत होता.


ईडीला 200 हून अधिक खाती वापरून पैसे हस्तांतरित करणे आणि हवालाद्वारे पैशांचा काही गैरवापर झाल्याची माहिती देखील मिळाली. तर शेल कंपन्यांशी संबंधित 100 हून अधिक खात्यांची अद्याप चौकशी सुरू आहे.


ही बातमी वाचा: