नाशिक : राज्यात एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु असताना नाशिकमध्ये (Nashik Crime News) मात्र राज्यपालपदाच्या नियुक्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे बारावी पास असणाऱ्या ठगाने एका उच्च शिक्षित शास्त्रज्ञालाच लुटल्याचं समोर आलंय. माझी अनेक अनेक राजकीय पक्षातील नेत्यांशी ओळख आहे. राज्यपाल करण्यासाठी 15 कोटी लागतात, असे सांगून शास्त्रज्ञाची तब्बल पाच कोटींची फसवणूक केली आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित निरंजन कुलकर्णी याला पोलिसांनी अटक केली आहे. 


संशयित निरंजन कुलकर्णी हा नाशिकच्या गंधर्व नगरी परिसरात वास्तव्यास आहे. निरंजन नाव असणाऱ्या व्यक्तीने थेट तमिळनाडूतील नरसिमा रेड्डी या शास्त्रज्ञाला 5 कोटी रुपयांना गंडविले आहे. नरसिमा रेड्डी आणि संशयित निरंजन कुलकर्णी यांची जानेवारी 2024 मध्ये दिल्लीत भेट झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले. निरंजन याने हळूहळू रेड्डी यांचा विश्वास संपादन केला. रेड्डी यांच्या नात्यातील एक व्यक्ती राजकारणात आहे. त्यामुळे राजकारणावर देखील दोघांच्या गप्पा झाल्या. त्याचाच फायदा घेत दिल्लीत राजकीय नेत्यांशी, मोठ्या अधिकाऱ्याशी ओळखी असल्याचे भासवित तुम्हाला राज्यपाल पद मिळवून देतो, असा दावा निरंजनने केला आणि रेड्डी त्याच्या भूलथापांना बळी पडले. 


15 कोटी रुपयांची मागणी 


कोणत्याही राज्याचे राज्यपाल पद मिळून देण्यासाठी 15 कोटी रुपयांचा खर्च त्याने रेड्डी यांना सांगितला. त्यापैकी टप्याटप्याने 5 कोटी 9 लाख 99 हजार रुपये रेड्डी यांनी रोख आणि खात्यावर जमा केलेत. पेंच आणि बोर व्याघ्र प्रकल्पाजवळ 100 एकर जमीन सरकारकडून लीजवर घेतल्याचे भासवून त्याचे बनावट कागदपत्र दाखवून माझ्यावर विश्वास नसेल तर सरकारी मोहर असणारे कागदपत्रे तुमच्याकडे ठेवा, असे सांगत त्याने रेड्डींचा विश्वास संपादन केला. 


संशयिताला दहा दिवसांची पोलीस कोठडी


आता या ठकबाजीचे कनेक्शन नागपूरशी जोडले गेले आहे. नागपूरचा विनोद दहाडे आणि त्याचे साथीदार देखील यात गुंतले असून वैश्विक सेवा फाउंडेशन नावाच्या संस्थानला जमीन घेण्यासाठी काही पैसे खात्यावर टाकण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. नागपूरच्या संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक नागपूरला रवाना झाले आहे. तर निरंजन कुलकर्णी याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


याआधी नाशिकच्या आमदारांची फसवणूक 


दरम्यान, गेल्या पाच वर्षात राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीनंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळातही  नाशिकच्या काही आमदारांना तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी संबंधितांनी पोलिसात  तक्रार केल्यानं दोघांना दिल्लीतून अटक देखील करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता थेट राज्यपालपदासाठी पैसे दिल्याचे आणि फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस काय कारवाई करतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


आणखी वाचा 


Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!