मालेगाव : नामको बँक, मालेगाव आर्थिक गैर व्यवहार फसवणूक प्रकरणी (Malegaon Money Laundering Case) आता मोठी अपडेट समोर येत आहे. फसवणूक झालेल्या 14 तरुणांची 11 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भेट घेणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे. तर एकट्या मालेगावातून 100 कोटी रुपये 'व्होट जिहाद'साठी (Vote Jihad) वापरले गेले. मौलाना सज्जाद नोमानी, मराठी मुस्लिम सेवा संघ, मुस्लिम उलेमा बोर्ड यांनी महाराष्ट्रात सभा घेतल्या. त्यांनी व्होट जिहाद अभियान चालवण्यासाठी ते १०० कोटी वापरल्याचा गंभीर आरोपही किरीट सोमय्या यांनी केलाय. 


आज मालेगावात किरीट सोमय्या दाखल झाले. यावेळी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले की, बुधवारी 11 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस व्होट जिहाद प्रकरणातील तरुणांना भेटणार आहेत. 14 तरुण विद्यार्थ्यांची फसवणूक करून सिराज अहमदने व्होट जिहाद प्रकरणी त्यांना फसवले. जयेश मिसाळ यांच्या घरी मी जावून आलो. हा खूप मोठा घोटाळा असून नामको बँक व इतर बँकामधून हा घोटाळा झाला आहे. तसेच इतर बँक देखील यात सहभागी आहेत. अक्रम अहमद, अब्दुल मेहमूद भगाड यांच्यासह 27 जणांच्या खात्यावर हा पैसा ट्रान्स्फर झालाय. नाशिक मर्चंट बँकेसह इतरही बँकांमधून हा घोटाळा झालेला आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. 


मालेगाव प्रकरणात देवेंद्र फडणवीस लक्ष घालणार


ते पुढे म्हणाले की, 1000 कोटींचा घोटाळा असून 600 कोटी दुबई येथे गेलेत. तर काही बँकेतून काढण्यात आले आहेत. 100 कोटी रुपये ऑक्टोबरमध्ये व्होट जिहाद अभियान चालवणाऱ्या लोकांच्या खात्यावर गेलेत. बँक ऑफ महाराष्ट्रने या संबंधात कारवाई केलेली नाही. 14 लोकांच्या खात्यातून सिराज मोहम्मद, अक्रम मोहम्मद नातानी, शेख शहाबाज, जाफरभाई नबिमुल्ला, अमीन वाघरिया, अब्दुल कादीर भगाड, असे 27 सिराज मोहम्मद अँड गँगच्या खात्यातून 114 कोटी जमा झालेत. ही व्याप्ती खूप मोठी असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यात लक्ष घालत आहेत. 


मालेगाव केंद्र म्हणून व्होट जिहादसाठी वापरले


केंद्रीय गृह मंत्रालय, ईडी, सीबीआय, फायनान्स, इंटेलिजन्स ब्यूरो महाराष्ट्र पोलीस यांनी पण तपास सुरू केला आहे. पुढील काळात महाराष्ट्र स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार आहे. राज्य पोलिसांसह मोठ्या एजन्सी यात तपास करीत आहेत. पुढील काळात यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल. मालेगाव केंद्र म्हणून व्होट जिहादसाठी वापरले गेले. 


मेहमूद भगाड हा मास्टर माईंड


मौलाना सज्जाद नोमानी, मराठी मुस्लिम सेवा संघ, मुस्लिम उलेमा बोर्ड यांनी महाराष्ट्रात सभा घेतल्या. या संस्था रेकॉर्डला नाही, संस्थेत रुपया नाही. त्यांना पैसे मालेगावातून गेले. बँक ऑफ महाराष्ट्रने या संबंधात कारवाई केलेली नाही. 21 राज्यात हे व्यवहार झाले आहेत आणि एकूण 47 ब्रांचमध्ये चौकशी होणार आहेत. मेहमूद भगाड हा मास्टर माईंड असून 1000 कोटींपेक्षा जास्त मोठा घोटाळा आहे. या व्होट जिहाद प्रकरणाचा मेहमूद भगाड प्रमुख आहे, सिराज हा केवळ एक एजंट आहे. व्होट जिहादचे नेते व प्रचारक यांना हे पैसे वाटण्यात आले. लूक आऊट नोटीस बजावण्यात आल्या.  दुबई, व्होट जिहादशी या प्रकरणाचे कनेक्शन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यात लक्ष घालून आहेत. यापुढे यात कारवाई होणार आहेत, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. तर तक्रारदार तरुणांना संरक्षण मिळावे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.  


आणखी वाचा 


Kirit Somaiya : महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींचा व्यवहार?