Hijab Controversy :  कर्नाटक राज्यात हिजाबवरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद आता राज्यातही उमटण्याची शक्यता आहे. नाशिकच्या मालेगाव शहरात शुक्रवारी हिजाब दिवस पाळला जाणार आहे.  मंगळवारी 'जमियत उलेमा ए हिंद'च्या प्रमुख मौलांनाची बैठक आमदार मौलाना मुफ्ती ईस्माईल यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी महिला मेळावा घेण्यात येऊन तेथे हिजाब आणि बुरखाधरी महिला येणार असून हिजाबचे समर्थन करण्यात येणार आहे. 


प्रत्येक धर्मात हवा तसा पोशाख घालण्याची मुभा आहे. मुस्लिम धर्मात महिला, तरुणी धर्मानुसार आचरण करीत आहे. मुस्लिम समाजात महिला, तरुणी पूर्ण कपडे घालून आपले शरीर झाकुन ठेवतात मग त्याला विरोध का असा प्रश्न मौलाना मुफ्ती यांनी उपस्थित केला आहे. शुक्रवारी मालेगावमध्ये 'हिजाब दिन' पाळण्यात येणार असून सर्व महिला त्या दिवशी बुरखा परिधान करतील अशी माहिती त्यांनी दिली. हिजाब हा मुस्लिम समाजात ईबादत म्हणून पाहिले जाते. जर हिजाब काढण्यासाठी बळजबरी केले जात आहे. अशा प्रकारे बंधन घालणे चुकीचे असल्याचं मत इरफान नदवी या मौलनांनी व्यक्त केले आहे. 


कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या वादाचे पडसाद राज्यात उमटण्याची भीती व्यक्त केली जात होती. या प्रकरणावरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. 


हिजाबचा मुद्दा जानेवारीपासून चर्चेत


हिजाबचा हा मुद्दा कर्नाटकात जानेवारीमध्ये सुरू झाला होता. जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये 6 मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले होते. महाविद्यालयाने गणवेश धोरणाचे कारण सांगितले, त्यानंतर विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि असा युक्तिवाद केला की त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम 14 आणि 25 अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.


कर्नाटकात तीन दिवस शाळा, महाविद्यालये बंद


कर्नाटक सरकारने शाळा आणि  महाविद्यालये 12 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात महाविद्यालये आणि शाळांबाहेर हिजाब समर्थक आणि हिजाब विरोधक  गटांकडून निदर्शने करण्यात येत आहे. हिजाब समर्थक ग्रुप हिजाब घातल्याने मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश नाकारल्याबद्दल आणि त्यांच्यावर लावण्यात आलेल्या बंधनांचा विरोध करत आहे. तर दुसरीकडे अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी हिजाबचा विरोध करत हिंदू विद्यार्थ्यांना देखील भगव्या रंगाची शाल आणि टोपी वाटत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: