Hijab Controversy : कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाबवरून महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करू पाहणाऱ्यांवर सरकारने कारवाई करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. कर्नाटकात विद्यार्थ्यांना मुस्लिम विद्यार्थिनींच्याविरुद्ध हिंसक चिथावणी दिली जात आहे. मुस्लिम मुलींना संरक्षण देऊ न शकणाऱ्या कर्नाटकच्या भाजप शासनाचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तीव्र निषेध करत असल्याचे पक्षाचे राज्य सचिव, माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले. सत्तेवर असलेला पक्षच तेथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत असून ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. 


मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घेऊन वर्गात बसणे हा त्यांचा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक अधिकार आहे. भाजपशासित कर्नाटक राज्यात समाजात धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणण्यासाठी विद्यार्थिनींवर हिजाबबंदी घातली जात आहे. विविध समाजात वेगवेगळ्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरा आहेत. ते समाज सार्वजनिक जीवनात त्यांचे पालन करत असतात. त्यामुळे दुसऱ्या परंपरा मानणाऱ्यांवर कसलाही अन्याय होत नाही. मुस्लिमांना आधुनिक शिक्षणव्यस्थेतून बहिष्कृत करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मनुवादी विचारसरणीचा अवलंब करत मुस्लिमांना नवे अस्पृश्य बनवू पहात असल्याचा आरोप आडम यांनी केला आहे. भाजपची कृती ही भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. मुस्लिम विद्यार्थिनींनी डोक्यावर हिजाब घेतल्याने वा शीख विद्यार्थ्यांनी डोक्यावर त्यांची पगडी घातल्याने शिक्षणात व्यत्यय येत नाही. त्यामुळे ठरवलेल्या मुख्य गणवेशाला बाधा येत नाही. एखाद्या विद्यार्थ्यास शेंडी ठेवून अथवा विद्यार्थिनीस कपाळावर कुंकू लावून वर्गात जायचे असेल तरी त्याला कुणाचा आक्षेप असायचे कारण नाही. तोच न्याय हिजाबबाबत लावला पाहिजे असेही त्यांनी म्हटले. 


महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न


कर्नाटकसारखाच प्रयत्न भाजप, रास्व संघ आणि हिंदुत्ववादी राजकीय पक्ष महाराष्ट्रात करू पाहात असल्याचा आरोप माकपने केला आहे.  महाराष्ट्र शासनाने मुस्लिम विद्यार्थिनींचा हिजाबसारख्या प्रकरणावरून सामाजिक छळ होणार नाही, येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची हमी घेतली पाहिजे अशी मागणी माकपने केली आहे. हिजाब घेणाऱ्या फातिमा शेख यांच्या साह्याने डोक्यावर पदर घेतलेल्या सावित्रीबाई फुल्यांनी महाराष्ट्रात सर्व जातीधर्मांच्या मुलींच्या शिक्षणाचा पाया घातला. या परंपरेला चूड लावू पाहणाऱ्या समाजविघातक मनुवादी प्रवृत्तींचा महाराष्ट्र शासनाने कडक बंदोबस्त करावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत असल्याचे नरसय्या आडम यांनी सांगितले.  


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha