Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 20 मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. आज महायुतीतून छगन भुजबळांचे (Chhagan Bhujbal) निकटवर्तीय दिलीप खैरे (Dilip Khaire), शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) यांनीदेखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. यापाठोपाठ नाशिकचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनीही महायुतीत नाशिकच्या जागेचा उमेदवार ठरलेला नसताना उमेदवारी अर्ज घेतला आहे. 


नाशिकच्या जागेवरून महायुतीत (Mahayuti) अद्याप तिढा कायम असल्याचे चित्र आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तर नाशिकच्या जागेसाठी अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. तर दुसरीकडे नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


हेमंत गोडसेंनी पहिल्याच दिवशी घेतला उमेदवारी अर्ज


विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्यांनी उमेदवारीसाठी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेत नाशिकच्या जागेसाठी मागणी केली आहे. मंत्री छगन भुजबळांना नाशिकच्या जागेवर उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र अचानक छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे हेमंत गोडसे यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र अजूनही नाशिकच्या जागेचा उमेदवार ठरलेला नाही. त्यातच आता हेमंत गोडसे आणि त्यांच्या सुनबाई भक्ती अजिंक्य गोडसे यांच्या नावाने अर्ज घेतले आहेत. महायुतीचा नाशिकच्या अद्याप निर्णय झाला नसताना गोडसे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने नक्की गोडसेंच्या मनात चाललंय तरी काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 


महायुतीतून नक्की कुणाला उमेदवारी? 


दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार, असे वक्तव्य केले. यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील नाशिकची जागा 100 टक्के शिवसेनेलाच मिळणार, असा दावा केला आहे. हेमंत गोडसे यांची निवडूक लढवण्याची तयारी असतानाच शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता नाशिकची जागा शिवसेनेलाच सुटणार का? नाशिकमधून नक्की कुणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


नाशिकमध्ये नवा ट्विस्ट, ना भुजबळ, ना गोडसे; दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच उमेदवारीचा लाभ !