Chhagan Bhujbal नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून (Nashik Lok Sabha Constituency) जाहीर माघार घेतली. भुजबळांच्या माघारीनंतर ओबीसी (OBC) समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. महायुतीला ओबीसी मतांची आवश्यकता नाही का? असा सवाल ओबीसी समाजाकडून उपस्थित करण्यात आला आहे. 


ओबीसींचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्याची सूचना देणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे आभार आम्ही मानतो. परंतु त्या सूचनेचे पालन न करणाऱ्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा निषेध करतो. तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) ओबीसींच्या मतांची आवश्यकता नाही का? असा सवाल ओबीसी नेते गजू घोडके यांनी केला आहे. 


भुजबळांनी सुरू केली होती मोर्चेबांधणी 


गजू घोडके म्हणाले की, महायुतीच्या जागा वाटपासाठी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. यावेळी अमित शाह यांनी छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा लढवावी असे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही भुजबळ यांनी निवडणूक लढवावी असे मत मांडले. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ यांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. 


पक्ष हितासाठी लोकसभा न लढविण्याचा भुजबळांचा निर्णय


अमित शाह यांनी सूचना दिल्यानंतर 26 दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊनही नाशिक लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी केली नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांनी दि. 19 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन पक्ष हितासाठी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. भुजबळ यांना मानणारा वर्ग राज्यासह दिल्ली, बिहार राजस्थान, गोवा, मध्यप्रदेश आदी राज्यात आहे. 


महायुतीला ओबीसींच्या मतांची गरज आहे की नाही?


त्यांनी दिल्ली येथील रामलीला मैदानावर जयपूर, पाटणा येथे ओबीसींच्या महारॅली घेतल्या होत्या. ते खासदार झाले असते तर देशातील ओबीसींमध्ये वेगळा संदेश गेला असता. त्याचा लाभ भाजपाला झाला असता ही बाब लक्षात घेऊन अमित शाह यांनी त्यांना उमेदवारी देण्याची सूचना केली. याबद्दल त्यांचे आभार. परंतु, नाशिक लोकसभेची उमेदवारी अद्याप घोषित न करणाऱ्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा निषेध करण्यात येत आहे. भुजबळ यांनी सगळा प्रस्थापित समाज अंगावर घेतला. ओबीसी बारा बलुतेदारांवरच प्रचंड मोठं संकट त्यांनी पेलले, एक ऋण म्हणून महायुतीला ओबीसींच्या मतांची गरज आहे की नाही? हा सवाल राज्यातील सर्व ओबीसी कार्यकत्यांना पडला आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


'सर्व्हेमध्ये नाशिकला शिवसेना जिंकणार हे समोर आल्यानेच छगन भुजबळांनी माघार घेतली'; वरूण सरदेसाईंनी डिवचलं