नाशिक : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा काल नारायणगडावर दसरा मेळावा (Dasara Melava 2024) पार पडला. आज मनोज जरांगे पाटील हे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या येवला विधानसभा मतदारसंघात (Yeola Assembly Constituency) येत आहेत. मात्र, मनोज जरांगे पाटील येवल्यात धडकण्यापूर्वी छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर टीका केलीये. 


मनोज जरांगे पाटील आज छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्मांतर घोषणा दिनाच्या निमित्ताने जरांगे हे येवल्यातील मुक्तीभुमी येथे अभिवादन करणार आहेत. तसेच कोटमगाव येथे जगदंबा माता मंदिरचे दर्शन जरांगे करणार आहेत. तर येवला तालुक्यातील नेवरगाव येथे एका कुटुंबीयांची ते सांत्वनपर भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ हे देखील आज विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी येवला दौऱ्यावर आहेत.


कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही : छगन भुजबळ 


छगन भुजबळ यांनी येवल्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या येवला दौऱ्याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, मी मराठ्यांचा द्वेष केला असता तर आरक्षणाच्या तीन कायद्यांना सपोर्ट केला नसता. माझे कार्यकर्ते 50 टक्क्यांपेक्षा जास्त मराठा आहेत. निवडणूकीत विजयी झालेले सुद्धा मराठा कार्यकर्ते आहेत. एकदा जरांगे काय जातीवाद करतात ते पाहा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोस्टरवर शाहू, फुले, आंबेडकर यांचे फोटो होते. ते जरांगे यांनी काढून टाकले होते. 30 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या मुक्तीभूमीत जरांगे यांचे स्वागत आहे. त्यानिमित्ताने त्यांना येवल्यात झालेला विकास दिसेल, असे त्यांनी म्हटले. तर सरकार उलथून टाकू, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. यावरून 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही', असा टोला भुजबळांनी जरांगेंना लगावला. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेचा आज 89 वा वर्धापन दिन 


दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13  ऑक्टोबर 1935 साली नाशिकच्या येवल्यातील मुक्तीभूमी येथे  "मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरीदेखील हिंदू म्हणून मरणार नाही" अशी घोषणा केली होती. या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी मुक्तीभूमीवर संपूर्ण भारत भरातून 'क्रांती स्तंभ, डॉ.बाबसाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा, व मुक्तिभूमी स्मारकाला मानवंदना करण्यासाठी लाखोच्या संख्येने आंबेडकरी  अनुयायी येत असतात. यावर्षी धर्मांतर घोषणेचा 89 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाने साजरा होत आहे. आज मंत्री छगन भुजबळ व मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्यभरातील नेते देखील अभिवादन करण्यासाठी दिवसभरात उपस्थित राहणार आहेत.


आणखी वाचा  


Chhagan Bhujbal: राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांदरम्यान भुजबळांचं विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले....