नाशिक: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांसोबतच नेत्यांनी देखील मोठी तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. मात्र, उमेदवारीबाबत आणि मतदारसंघाबाबत काही नेत्यांची वक्तव्य देखील यावेळी चर्चेचा विषय ठरत आहेत, आगामी विधानसभा निवडणुकीत येवला मतदारसंघातून मीच निवडणूक लढणार अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं आहे. सध्या येवला विधानसभा लढण्यासाठी पक्षाचा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह त्यामुळे येवला विधानसभा लढावीच लागणार असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आहे.


अशातच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्याला काही काळ आराम करायचा असल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे निवृत्तीचे संकेत देखील दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.  सामाजिक कार्याची जबाबदारी मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी घ्यावी, राजकारणात स्वत:च्या निर्णय क्षमतेवर पुढे जावे, असे आवाहन छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केल्याने राजकीय वर्तुळात छगन भुजबळ निवृत्ती घेणार का अशा चर्चा सुरू होत्या, तर आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीआधी त्यांनी मतदारांनादेखील भावनिक साद घातली असल्याचं दिसून आलं.


त्याचबरोबर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. येवला मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक मीच लढवणार आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली आहे.  छगन भुजबळांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी फार इच्छुक नसल्याचं सांगितलं होतं. 
त्याचबरोबर 1985 पासून या क्षेत्रात आहे, आता नव्या पिढीनं ही जबाबदारी घ्यायला हवी, असं देखील भुजबळ म्हणाले होते. आता मात्र, त्यांनी येवला विधानसभेची निवडणूक आपणच लढणार असल्याचं म्हणत शड्डू ठोकला आहे. माझ्या वाढत्या वयामुळे मुलांना केवळ त्यांचे निर्णय त्यांनी घ्यावेत फक्त शिव शाहू फुले आंबेडकर विचार सोडू नये असा सल्ला दिला असल्याचं देखील भुजबळ यावेळी म्हणालेत.


सध्या येवला विधानसभा लढण्यासाठी पक्षाचा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह त्यामुळे येवला विधानसभा लढावीच लागणार असं म्हणत भुजबळ यांनी येवला मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. तर लोकसभा निवडणुकीच्या काळापासून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, आता त्यांना पुन्हा एकदा येवल्यातून आमदारकीसाठी तयारीला लागल्याचं चित्र आहे. मागील दोन दशकांपासून या मतदारसंघावर त्यांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यांनी आधी एका वृत्तपत्राशी बोलताना दिलेल्या निवृत्तीच्या संकेतामुळे या मतदारसंघाची जबाबदारी ते कुणाकडे देणार, अशा चर्चांना सुरू होत्या. मात्र, येवल्यात भुजबळ हेच स्वत: उमेदवार असणार आहेत.