अन् त्यांनी मरणाचा उत्सव केला; नाशिकमधील परिवाराचा दशक्रिया विधीला फाटा देत रक्तदान, कोविड लसीकरण
Nashik News : दशक्रिया विधीला होणारी भाषणे आणि इतर कार्यक्रमांना फाटा देत मातोरी येथील पिंगळे परिवाराने आदर्श उभा केला आहे.
नाशिक : दशक्रिया विधीला होणारी भाषणे आणि इतर कार्यक्रमांना फाटा देत मातोरी येथील पिंगळे परिवाराने आदर्श उभा केला आहे. दशक्रिया विधीला फाटा देत रक्तदान आणि कोविद लसीकरण करण्यात आल्याचा स्त्युत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांचा मातोश्री सावित्रीबाई पोपटराव पिंगळे यांचे 5 मे रोजी 89व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले होते, त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन बहिणी व जावई असा परिवार आहे. या सगळ्यांनी एकमताने निर्णय घेत दशक्रिया विधी निमित्त पारंपरिक कार्यक्रमांना फाटा देत दहाव्याच्या दिवशी 100 रक्त पिशव्या संकलन करण्याचा संकल्प करत रक्तदान शिबिर आणि कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम आयोजित करण्याचे पिंगळे कुटुंबीयांनी ठरवले. यासाठी मातोरी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातच दहाव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,
या कार्यक्रमात संदर्भ सेवा रुग्णालयाची शासकीय रक्तपेढी व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने रक्तदान शिबिर व कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली दरम्यान कार्यक्रमासाठी आलेले ग्रामस्थ, पिंगळे कुटुंबीयांचे आप्तेष्ट , मित्र आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी,ग्रामसेवक,आरोग्य कर्मचारी व अधिकारी तसेच WMO चे सदस्य यांनी रक्तदान केले, त्याचबरोबर अनेक ग्रामस्थांनी कोविड 19 प्रतिबंधात्मक लस घेतली, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या कार्यक्रमाप्रसंगी भेट देत दुःखद प्रसंगावेळी समाजभान दाखवत रक्तदान आणि कोविड लसीकरण आयोजित केल्याबद्दल पिंगळे कुटुंबीयांचे कौतुक केले,
रक्तदान करत आईला मुलाची श्रद्धांजली
दशक्रिया विधी निमित्त रक्तदानाचे आवाहन करत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी स्वतः तसेच पत्नी जयश्री यांनी रक्तदान करत आईला श्रद्धांजली वाहिली. दशक्रिया विधी निमित्त पारंपरिक पद्धतीना फाटा देत रक्तदान शिबिर व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम हा अनोखा उपक्रम राबवल्यामुळे पिंगळे कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पिंगळे कुटुंबीयांसमवेत मातोरीचे सरपंच दीपक हगवणे, उपसरपंच मनीषा रोकडे,सर्व सदस्य, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, गट विकास अधिकारी डॉ सारिका बारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शैलेश निकम, वैद्यकीय अधिकारी डॉ अमित पाटील, डॉ पुरी यांनी मेहनत घेतली.