मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये अजितदादा गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी वक्तव्यं पाहिल्यास ते महायुतीवर (Mahayuti) नाराज तर नाहीत ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत त्यांना विचारले असता, मी नाराज नाही, पण मी विरोधासाठी विरोध करत नाही, असे स्पष्टीकरण भुजबळांनी दिले. मात्र, तरीही भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) नाराजीच्या चर्चेचा जोर काही कमी झालेला नाही. 


या सगळ्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाशिक लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडला तेव्हापासून झाली. भाजप नेतृत्वही छगन भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी अनुकूल होते. मात्र, शिंदे गट या जागेसाठी शेवटपर्यंत अडून बसल्याने छगन भुजबळ यांची लोकसभा लढण्याची इच्छा फलद्रुप झाली नाही. तेव्हापासूनच छगन भुजबळ यांचे बिनसल्याचे पाहायला मिळत आहे. 


छगन भुजबळांच्या नाराजीचे कारण?


सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिक लोकसभेची जागा न मिळाल्यामुळेच छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितले जाते. नाशिकमधून लोकसभेला उभं राहण्याची इच्छा अपूर्ण राहिल्यानंतरच छगन भुजबळ यांनी महायुतीला अडचणीत आणणारी वक्तव्य करायला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी एकापाठोपाठ एक महायुतीच्या भूमिकेशी विसंगती साधणारी वक्तव्यं केली आहेत. महाडमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनावधानाने घडलेल्या कृतीनंतर भाजप आणि अजितदादा गटाच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात रान उठवले होते. आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारुन आणि त्यांचे फोटो जाळून निषेध व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आव्हाडांकडून ही कृती अजाणतेपणाने घडली असून त्यामुळे मनुस्मृतीच्या मूळ मुद्द्यावरुन लक्ष भरकटता कामा नये, असे सांगत छगन भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केली होती. त्यामुळे भाजप आणि अजितदादा गटाच्या नेत्यांनी आव्हाडांविरोधात सुरु केलेल्या आंदोलनातील हवाच निघून गेली होती. 


छगन भुजबळांची महायुतीची डोकेदुखी वाढवणारी वक्तव्ये



* 'लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेल्या ४०० पारच्या नाऱ्याचा फटका बसला'


* लोकसभेला जागावाटपात घटक पक्षांकडून दबाव तंत्राचा वापर झाला, तो आता राष्ट्रवादीच्या बाबत विधानसभेला व्हायला नको.


* विधानसभा निवडणुकीत 80 ते 90 जागा राष्ट्रवादीला आम्ही देऊ, असं आश्वासन सत्तेत सहभागी होताना भाजपने दिलं आहे. त्याची आठवण त्यांना करुन द्या. 


छगन भुजबळ पुन्हा महाविकास आघाडीत जाणार का?


छगन भुजबळांची महायुतीला डोकेदुखी वाढवेल अशी वक्तव्यांची मालिका सुरु असताना दुसरीकडे महाविकास आघाडीशी जवळीकता साधता येईल, अशी  वक्तव्यही भुजबळांनी केल्याचे पाहायला मिळाले.  घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर  भाजपचे नेते सातत्यानं ज्यांच्यावर टीका करत होते त्या उद्धव ठाकरे यांचीच पाठऱाखण भुजबळांनी केल्याचं पाहायला मिळाले.


तर दुसरीकडे शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ज्यांची ओळख आहे त्या जितेंद्र  आव्हाड यांची बाबासाहेब आंबेडकर प्रकरणात समोर येऊन पाठराखण करुन  स्वत: साठी शरद पवार गटाचा रस्तादेखील छगन भुजबळांनी खुला केल्याची चर्चा सुरु झाली आहे. 


एकीकडे आव्हाडांची छगन भुजबळ यांनी पाठराखण केली तर दुसरीकडे छगन भुजबळ यांची संघटना असणाऱ्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीविरोधात जोरदार आंदोलने राज्यभरात करून आव्हाड यांच्या विरोधातील विरोध कमी केल्याचं पाहिला मिळत आहे. एकंदरीतच 4 जून नंतरच्या निकालानंतर  राज्यातील महाविकास आघाडीचं प्राबल्य वाढल्यास छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीची वाट धरल्याचे पाहिला मिळाल्यास नवल वाटायला नको.


आणखी वाचा


काय समज द्या, समज द्या लावलंय, मी माझ्या पक्षात बोलणारच, 80-90 जागांवरुन भुजबळांनी भाजपला सुनावलं!