(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Padvidhar Election : नाशिक पदवीधर निवडणूक : अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील मातोश्रीवर, महाविकास आघाडी पाठिंबा देणार का?
Nashik Padvidhar Election : अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना नाशिक पदवीधर निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
Nashik Padvidhar Election : नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना या निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Padvidhar Election) एका पाठोपाठ एक ट्विस्ट समोर येत असून अशातच अपक्ष उमेदवार म्हणून असलेल्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी मुंबई गाठली असून त्या महाविकास आघाडीच्या बैठकीला (Mahavikas Aaghadi) उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या गोंधळानंतर मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) नेते सुभाष देसाई व नाशिकमधील पदाधिकारी उपस्थित आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनी फॉर्म भरल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. काँग्रेसच्या गोटात या गोधळांमुळे अस्वस्थता निर्माण झाली असून याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी सकाळी बोलताना नाशिक पदवीधर निवडणूक ही बिनविरोध होणार नाही, कुणाला पाठिंबा द्यायचा या संदर्भात बैठक होणार असल्याचे सांगितले. याच दरम्यान आता नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या देखील मुंबईत दाखल झाल्या आहेत.
नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून ट्विस्ट बघायला मिळत असून ते ट्विस्ट आज देखील कायम असल्याचे चित्र आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज सकाळी संजय राऊत यांनी असं म्हटलं की, ही नाशिकची पदवीधरची निवडणूक आम्ही कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ देणार नाही. त्याच वेळेला हे स्पष्ट झालं होतं की शिवसेनेच्या वतीने किंवा महाविकास आघाडीच्या वतीने एखाद्या अपक्ष उमेदवाराला या ठिकाणी पुरस्कृत म्हणून सत्यजित तांबे यांच्या विरोधात मैदानात उतरवले जाईल. आणि आता शुभांगी पाटील ज्या कालपर्यंत भाजपाच्या उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आता नाशिकमध्ये शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजित तांबे अशी लढत होणार का? अशा चर्चाही होत आहेत.
धुळे येथील शुभांगी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपच्या वतीने त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता आहे. मात्र भाजपने कोणालाही ए बी फॉर्म दिलेला नव्हता. त्यामुळे शुभांगी पाटील या फक्त अपक्ष उमेदवार म्हणूनच त्या ठिकाणी मैदानात होत्या. आता मात्र शुभांगी पाटील या थेट मातोश्रीवर दाखल झाल्या असून त्यांना महाविकास आघाडीचा पूर्ण पाठिंबा मिळणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांची ताकद निश्चितपणे वाढणार असून सत्यजित तांबे यांच्यासमोर शुभांगी पाटील कितपत मैदान गाठू शकतील? कितपत मैदानात लढू शकतील हा मात्र पुढचा प्रश्न आहे.