Nashik Crime News : गंजमाळ (Ganjamal) परिसरातील पंचशील नगरमध्ये (Panchashil Nagar) 19 वर्षीय तरुणाची घरात झोपलेला असताना वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. पांडुरंग उर्फ पांड्या हनुमंत शिंगाडे (19, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यात आता भद्रकाली पोलिसांना (Bhadrakali Police) यश आले. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, पांडुरंग शिंगाडे (Pandurang Shingade) हा गुरुवारी दिवसभर बाहेर होता. मध्यरात्री पंचशीलनगरातील अमर पेपरजवळील देवी मंदिरानजीकच्या घरात तो झोपलेला असताना त्याच्या ओळखीतील व परिसरातच राहणारे संशयित मित्र धारदार हत्यारांसह घरात शिरले आणि गाढ झोपेत असलेल्या शिंगाडे याच्या पोटावर, पाठीवर वार केले. 


नातलगांचा जिल्हा रुग्णालयाच्या गेटसमोर गोंधळ 


अतिरक्तस्त्राव झाल्याने तो जागीच मरण पावला. घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. यानंतर यंत्रणेने मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. त्याचवेळी मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करून पंचशीलनगरात राहणाऱ्या मृताच्या नातलगांनी व रहिवाशांनी जिल्हा रुग्णालयाच्या गेटसमोर गोंधळ घातला होता. यानंतर संशयितांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली होती. 


तीन संशयितांना बेड्या 


मृत पांडुरग आणि संशयित मारेकऱ्यांत काही दिवसांपूर्वी मद्य पिण्याच्या वादासह पैशांच्या कारणातून वाद झाले होते. त्यांच्यात नेहमीच टिंगलटवाळी आणि क्षुल्लक कारणांतून वाद होत होते. याचा वचपा काढण्यासाठी संशयितांनी नियोजनबद्धरित्या ही हत्या केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत तिघांना सातपूर परिसरातून फिल्मी स्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक तपास केल असता मयत पांडुरंग आणि आरोपी सोबत फिरायचे. मात्र, पांडुरंग वारंवार या तिघांना मारायचा म्हणून या तिघांनी पांडुरंगला मारल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Nashik Accident : सप्तशृंगी गडावरून परतताना काळाचा घाला, दोन कारची समोरासमोर धडक; एक ठार, गंभीर जखमी


Nashik Accident : पुलाचे कठडे तोडत कार थेट कोसळली गोदावरी नदीत, नाशिकमध्ये पुन्हा भीषण अपघात