नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद गावात दारुची बाटली अखेर आडवी झाली असून दारुबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय झाला. नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुबंदीसाठी मतदान घेण्यात आलं होतं. बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात 677 पैकी 612 महिलांनी दारुबंदीसाठी कौल दिला. त्यामुळे या गावात आता दारुबंदी होणार हे स्पष्ट झालंय.
नंदुरबारमधील असलोद गावामध्ये दारुबंदीसाठी महिलांचे मतदान घेण्यात आलं. एकूण 1216 पैकी 677 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 612 महिलांनी आडवी बाटली म्हणजे दारुबंदीच्या बाजूने मतदान केलं. तर 49 महिलांनी उभी बाटली म्हणजे दारुबंदीच्या विरोधात मतदान केलं. त्यानंतर मतमोजणीमध्ये दारुबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय झाल्याचं स्पष्ट झालं. दारुबंदीच्या बाजूनं महिलांनी कौल दिल्यानं गावकऱ्यानी एकच जल्लोष केला.
एकूण झालेले मतदान 677
- उभी बाटली 49
- आडवी बाटली 612
- बाद मते 16
Asalod Village Voting For Liquor Ban : बॅलेट पेपरवर मतदान झालं
गावात दारूबंदीसाठी महिलांनी घेतलेला निर्णय आणि त्यांना मिळालेली गावकऱ्यांची साथ, यामुळे गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान पार पडलं. यामध्ये अखेर महिलांचा विजय झाला असून दारुची बाटली आडवी झाली आहे.
प्रशासनाचा मोठा बंदोबस्त तैनात
शहादा तालुक्यातील असलोद येथे दारुबंदीसाठी रविवारी सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर मतदानासाठी महिलांच्या रांगा लागल्याचं चित्र होतं. त्यावेळी गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महसूल प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी असलोद गावात आले होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर लगेच प्रशासनाने मतमोजणीला सुरूवात केली.
दारुमुळे गावातील तरुण पिढीवर परिणाम होत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी, महिलांनी सुरू केलेल्या लढ्याला अखेर यश आलं आहे. दारुबंदीसाठी मतदान घेणारे आणि दारुबंदी करणारे असलोद हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले
अनेक वर्षांपासून दारुबंदीसाठी महिलांचा लढा
असलोद गावात महिलांकडून दारूबंदीची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. अखेर पाठपुराव्यानंतर गावात दारूबंदीसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दारुमुळे अनेक कुटुंबात कलह निर्माण होत होता. गावातील तरुण व्यसनाधीन होत असून अनेकांचे परिवार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावात दारूबंदी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येत मतदान केल्याचं एका महिलेने सांगितलं.
ही बातमी वाचा: